Indian mens win gold medal in trap shooting: चीनमधील हांगझोऊ येथे खेळल्या जात असलेल्या १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची पदकांची घोडदौड कायम आहे. रविवारी या स्पर्धेच्या आठव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. टीम इंडियाला सुवर्णासोबत रौप्य पदकही मिळाले. भारतीय नेमबाज के चेनाई, पृथ्वीराज तोंडाईमन आणि जोरावर सिंग यांनी चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले. तसेच महिला सांघिक ट्रॅप नेमबाजीत रौप्यपदक जिंकले. त्याचबरोबर आदिती अशोकने गोल्फमध्ये रौप्यपदक पटकावले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमबाजीत भारताने सातवे सुवर्ण जिंकले आहे. के चेनाई, पृथ्वीराज आणि जोरावर या त्रिकुटाने पुरुषांच्या सांघिक ट्रॅप नेमबाजीत चमकदार कामगिरी केली. भारतीय नेमबाजांनी ३६१ गुण मिळवत सुवर्णपदक जिंकले. आशियाई क्रीडा स्पर्धेतील ट्रॅप शूटिंगमध्ये संघाची ही सर्वोच्च गुणसंख्या आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता के चेनाई आणि जोरावर सिंग पुरुषांच्या वैयक्तिक अंतिम फेरीत लढतील.

याआधी ऐश्वर्य तोमर, रुद्रांक्ष पाटील आणि दिव्यांश पनवार यांनी १० मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. मनू भाकर, ईशा सिंग, रिदम संगवान यांनी २५ मीटर पिस्तूल सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. सिफ्ट कौर समरा हिने महिलांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशनमध्ये सुवर्णपदक जिंकले. अर्जुन चीमा, सरबज्योत सिंग आणि शिव नरवाल यांनीही नेमबाजीत सुवर्णपदक पटकावले. या त्रिकुटाने पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूलमध्ये चमकदार कामगिरी केली.

हेही वाचा – MS Dhoni: ‘माही भाई आय लव्ह यू’, चाहत्याच्या या हाकेला महेंद्रसिंग धोनी काय दिले उत्तर? पाहा VIDEO

महिला संघानेही अप्रतिम कामगिरी केली आहे. राजेश्वरी कुमारी, मनीषा कीर आणि प्रीती रजक यांनी महिला सांघिक ट्रॅप नेमबाजीत ३३७ गुण मिळवत रौप्यपदक पटकावले आहे. अशा प्रकारे भारताने एकूण ४१ पदके जिंकली आहेत. त्यात ११ सुवर्णपदकांचा समावेश आहे.

अदिती अशोकने पटकावले रौप्यपदक –

रविवारी देशाला गोल्फमध्ये पहिले पदक मिळवून दिले. आदिती अशोकने गोल्फमधे रौप्यपदक पटकावले. थायलंडच्या अपिर्चाया युबोलने शेवटच्या दिवशी शानदार कामगिरी दाखवत सुवर्णपदक पटकावले. त्याच वेळी, आदिती अशोकने शेवटच्या दिवशी अगदी सामान्य कामगिरी केली. सात स्ट्रोकची आघाडी घेतल्यानंतर सामन्याच्या शेवटी ती दोन स्ट्रोकने मागे पडली आणि सुवर्णपदक हुकले.

आतापर्यंत भारताची एकूण पदकसंख्या किती आहे?

सुवर्णपदक : ११
रौप्यपदक : १६
कांस्यपदक : १४
एकूण पदकं: ४१

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: K chennai prithviraj tondaiman and jorawar singh mens team won gold medal in team trap shooting in asian games vbm