Kane Williamson 31st Test Century : न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज केन विल्यमसन त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम टप्प्यात आहे. विल्यमसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावातही शतक झळकावले आहे. विल्यमसनचे कसोटी क्रिकेटमधील हे ३१ वे शतक आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांच्या बाबतीत विल्यमसन आता भारताच्या विराट कोहली आणि इंग्लंडच्या जो रूटच्या पुढे आहे. सक्रिय क्रिकेटपटूंमध्ये आता फक्त ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ केन विल्यमसनच्या पुढे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात झळकावलेले शतक हे केन विल्यमसनच्या कसोटी कारकिर्दीतील ३१वे शतक आहे. फॅब-फोरमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत विल्यमसन आता दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडच्या जो रूटची ३० आणि भारताच्या विराट कोहलीची २९ शतके आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथच्या नावावर ३२ शतके आहेत.

विल्यमसन सर्वात कमी डावात ३१ शतके करणारा तिसरा फलंदाज –

न्यूझीलंडचा केन विल्यमसन कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात कमी डावात ३१ शतके झळकावणारा जगातील तिसरा फलंदाज ठरला आहे. विल्यमसनने कसोटी क्रिकेटमधील आपल्या १७० व्या डावात ३१वे शतक झळकावले आहे. या विक्रमांच्या यादीत विल्यमसनने ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज रिकी पाँटिंग आणि पाकिस्तानचा माजी महान फलंदाज युनिस खानला मागे टाकले आहे. युनूस खानने १८४ डावात ३१ शतके झळकावली होती. त्याचबरोबर पाँटिंगने १७४ डावात ३१ शतके झळकावली होती.

हेही वाचा – IND vs ENG 2nd Test : भारताविरुद्धच्या पराभवानंतर बेन स्टोक्सने तंत्रज्ञानावर उपस्थित केले प्रश्न

न्यूझीलंडने उभारला धावांचा डोंगर –

या कसोटीच्या पहिल्या डावात केन विल्यमसनने ११८ धावांची खेळी साकारली होती. दुसऱ्या डावात त्याने १०९ धावा केल्या. न्यूझीलंडने पहिल्या डावात ५११ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ १६२ धावा करू शकला. यानंतर, तिसऱ्या दिवसअखेर किवी संघाने ४ बाद १७९ धावा केल्या आहेत. या स्थितीत न्यूझीलंडची एकूण आघाडी ५२८ धावांची झाली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kane williamson moved into the second spot for most centuries among the fab four after 31st century vbm
First published on: 06-02-2024 at 11:50 IST