न्यूझीलंडचा स्टार खेळाडू केन विलियम्सन सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेली टी-२० ब्लास्ट स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. या स्पर्धेतील मिडलसेक्स विरूद्ध सर या दोन्ही संघांमधील सामना लॉर्ड्सच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात केन विलियम्सन तुफान चर्चेत राहिला. आपल्या फलंदाजीसाठी ओळखला जाणारा केन विलियम्सन यावेळी क्षेत्ररक्षण करताना पडकलेल्या झेलमुळे चर्चेत आला आहे. त्याने सीमारेषेवर डाइव्ह मारून घेतलेल्या भन्नाट झेलचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

जेसन रॉयला बाद करण्यासाठी केन विलियम्सनचा भन्नाट झेल

केन विलियम्सन या स्पर्धेत मिडलसेक्स संघाचं प्रतिनिधित्व करत आहे. या संघाकडून खेळताना त्याने सीमारेषेवर भन्नाट झेल घेतला. तर झाले असे की, मिडलसेक्स संघाची गोलंदाजी सुरू असताना, लेग स्पिनर ल्यूक हॉलमन गोलंदाजीला आला. त्याने ऑफ स्टंपच्या बाहेर लेग ब्रेक चेंडू टाकला. या चेंडूवर फलंदाजी करत असलेल्या जेमन रॉयने बाहेर निघून कव्हरच्या वरून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. त्याने फटका बनवून मारला, चेंडू वेगाने सीमारेषेच्या बाहेर जात होता. इतक्यात सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या केन विलियम्सनने धावत येऊन डाईव्ह मारली आणि भन्नाट झेल घेतला. हा झेल टिपताच लॉर्ड्सवर सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटासह त्याचे कौतुक केले.

हेही वाचा

या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या सरे संघाने २० षटकअखेरीस ९ बाद १८९ धावांचा डोंगर उभारला. यादरम्यान सरे संघाकडून फलंदाजी करताना विल जॅक्सने ३६ चेंडूंचा सामना करत ५२ धावांची खेळी केली. तर टॉम करनने ४७ धावा चोपून काढल्या. यादरम्यान मिडलसेक्स संघाकडून गोलंदाजी करताना रायन हिगिन्सने गोलंदाजी करताना दमदार कामगिरी केली. त्याने या डावात ४ गडी बाद केले.

मिडलसेक्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी १९० धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मिडलसेक्स संघाकडून स्टीफन एस्किनाझीने सर्वाधिक ५३ धावा चोपल्या. या धावांचा पाठलाग करताना मिडलसेक्सचा संघ विजयाच्या अगदी जवळ पोहोचला होता. पण, मधल्या षटकांमध्ये भागीदारी न झाल्याने मिडलसेक्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला. यासह सरे संघाने हा सामना ८ धावांनी आपल्या नावावर केला. मिडलसेक्सने हा सामना गमावला, पण केन विलियम्सनने टिपलेला झेल तुफान चर्चेत राहिला.