मात्र पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारताने पाकिस्तानशी सामना खेळू नये, असा सूर सर्वत्र उमटू लागला आहे. मात्र, भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांच्यामते भारताने पाकिस्तानसोबत खेळायचे की नाही याचा निर्णय सरकराचा असल्याचे मत व्यक्त केले आहे. सिंहगड इन्स्टिट्यूट आयोजित विविध क्रीडा स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ कपिलदेव यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी माजी क्रिकेटपटू प्रवीण आमरे उपस्थित होते.

यावेळी बोलताना कपिल देव म्हणाले की, पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळायचे की नाही, याचा निर्णय सरकारने घेतला पाहिजे. त्याचा विचार आपण करायला नको किंवा त्यावर मत मांडायला नको. सरकार जो निर्णय घेईल, त्याच्यासोबत आपण असू. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कपिलदेव म्हणाले, खेळाची आवड जोपासा; पण शिक्षणही पूर्ण करा. वेळ न वाया घालविता जीवनात चांगले काम करा. ज्या क्षेत्रात आवड आहे, त्यात यशस्वी होण्यासाठी कष्ट करा.

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा प्रभाव भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट खेळाडूंवरही झाला आहे. या हल्ल्यानंतर माजी कर्णधार सौरव गांगुली, हरभजन सिंग यांच्यासारख्या अनेक बड्या खेळाडूंनी पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध तोडण्यात यावे असा पवित्रा घेतला. तसेच   भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना न खेळण्याचीही मागणी जोर धरत आहे.

दरम्यान, पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४० हून अधिक जवान शहीद झाले. त्यानंतर भारतातील राज्य क्रिकेट संघटनांनी पाकिस्तानी क्रिकेटपटूचे फोटो आपल्या स्टेडियममधून आणि मुख्यालयात हटवले. तसेच त्यानंतर अनेक क्रिकेट जाणकारांनी आणि दिग्गज क्रिकेटपटूंनी हा सामना रद्द करण्याची मागणी केली होती.