वृत्तसंस्था, पंचकुला : टेनिस, टेबल टेनिस आणि जलतरण क्रीडा प्रकारात मिळवलेल्या तीन सुवर्णपदकांच्या (चार रौप्य आणि पाच कांस्यपदके) बळावर महाराष्ट्राने शनिवारी खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत हरयाणाला मागे टाकले. महाराष्ट्राच्या खात्यावर ३७ सुवर्ण, ३३ रौप्य आणि २८ कांस्य अशी एकूण ९८ पदके जमा आहेत, तर हरयाणाने ३६ सुवर्ण, ३३ रौप्य आणि ३९ कांस्यपदकांसह १०८ पदके कमावली आहेत.
जलतरणात अपेक्षा फर्नाडिसने २०० मीटर मुलींच्या वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक मिळवताना २:२५.१८ सेकंदांचा नवा विक्रम नोंदवला. चार बाय १०० मीटर रीलेमध्ये भक्ती वाडकर, अपेक्षा फर्नाडिस, संजिती साहा, आन्या वाला यांनी रौप्यपदक संपादन केले. याचप्रमाणे २०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये पलक जोशीने २:२७.९६ सेकंदांसह रुपेरी पदक जिंकले.
टेबल टेनिसमध्ये मुलींच्या दुहेरीत दिया चितळे आणि स्वस्तिका घोष जोडीने हरयाणाच्या प्रिथोकी चक्रवर्ती आणि सुहाना सैनी यांना १४-१२, ११-०९, ११-६ असे हरवून सुवर्णपदक पटकावले. टेनिसमध्ये महाराष्ट्राच्या आकांक्षा निठुरेने कर्नाटकच्या सुहिता मयुरीचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. आकांक्षाने ६-७, ७-६, ६-४ अशा फरकाने सुहिताला हरवले. आकांक्षाने रूमा गायकैवारीसह दुहेरीत कांस्यपदकही मिळवले. मग महाराष्ट्राच्या वैष्णवी आडकरने (पुणे) एकेरीत कांस्यपदक पटकावले. तसेच वैष्णवीने सुदिप्ता कुमारच्या साथीने महिला दुहेरीचे रौप्यपदक मिळवले. तमिळनाडूच्या लक्ष्मीप्रभा आणि जननी रमेश जोडीने त्यांना पराभूत केले. याचप्रमाणे सायकिलगमध्ये मास स्टार्ट प्रकारात सिद्धेश पाटीलने रौप्यपदक पटकावले.
खो-खोमध्ये महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी उपांत्य फेरी गाठली. अखेरच्या साखळी सामन्यात मुलींच्या संघाने पंजाबवर १०-८ (१०-४) अशी एक डाव व २ गुणांनी सहज मात केली तर मुलांच्या संघाला विजयासाठी पश्चिम बंगालने १८-१५ (८-१०) असे चांगलेच झुंजवले. मुलींच्या संघातील अश्विनी शिंदे, कौशल्या पवार, प्रीती काळे आणि वर्षांली भोयेने अप्रितम खेळ केला. मुलांच्या संघातर्फे रोहन कोरे, आकाश तोगरे, आदित्य कुडले आणि सुफियान शेखने महाराष्ट्राच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
