भारताच्या कोनेरू हम्पी हिने शानदार विजयाची मालिका राखताना रशियाच्या अ‍ॅलिसा गॅलियामोवा हिच्यावर मात केली आणि सहाव्या विजयासह जागतिक महिला बुद्धिबळ स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली. तिची सहकारी द्रोणावली हरिका हिला अ‍ॅलेक्झांड्रा कोस्टेंचुकविरुद्धच्या दुसऱ्या डावात पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे तिचे भवितव्य टायब्रेकर डावांवर अवलंबून राहणार आहे.
हम्पीने गॅलियामोवाविरुद्ध पहिला डाव जिंकला होता, त्यामुळे दुसऱ्या डावात तिला फक्त अध्र्या गुणाची आवश्यकता होती. हम्पीने कामगिरीतील सातत्य राखताना सलग सहावा डाव जिंकला. तिने या डावात वजिरावजिरीनंतर खेळावर संपूर्ण नियंत्रण मिळविले व ५३व्या चालीत विजय मिळविला.
हरिकाने कोस्टेंचुकविरुद्ध पहिल्या डावात काळ्या मोहरांनी विजय मिळविला होता. त्यामुळे दुसऱ्या डावात तिला पांढऱ्या मोहरांनी खेळण्याचा फायदा होता. मात्र दडपणाखाली खेळताना हरिकाने योग्य मोहरांची बदलाबदली केली नाही व खेळावरील नियंत्रण गमावले. तिची प्यादी जखडवून ठेवीत कोस्टेंचुकने तिला आणखीनच संभ्रमात टाकले. तिने जोरदार चाली करीत हरिकाचा बचाव उद्ध्वस्त केला.