वानखेडे कसोटीत इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात सर्वबाद ४०० धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने दुसऱया दिवसाच्या अखेरीस १ बाद १४६ अशी मजल मारली आहे. भारतीय संघ अजूनही २५४ धावांनी पिछाडीवर असून भारताच्या हातात अजूनही ९ विकेट्स आहेत. मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा यांनी मैदानात चांगला जम बसवला आहे. इंग्लंडच्या धावसंख्येचा पाठलाग करताना केएल राहुल २४ धावांवर बाद झाला. मोईन अलीने राहुलला क्लीनबोल्ड केले. केएल राहुल माघारी परतल्यानंंतर चेतेश्वर पुजारा आणि मुरली विजय यांनी शतकी भागीदारी रचून संघाला १०० आकडा गाठून दिला.
मुरली विजयने कसोटी कारकिर्दीतील आपले १६ वे अर्धशतक पूर्ण केले असून तो दुसऱया दिवसाचा खेळ संपला तेव्हा ७० धावांवर नाबाद आहे. तर पुजारा नाबाद ४७ धावांवर खेळत आहे. इंग्लंडच्या पहिल्या डावात पदार्पणवीर किटॉन जेनिंग्स याने सर्वाधिक ११२ धावांची खेळी साकारली, तर सामन्याच्या दुसऱया दिवशी मैदानात टीच्चून फलंदाजी करत ७६ धावांचे योगदान दिले. भारतीय संघाकडून अश्विनने ६ विकेट्स घेतल्या, तर रवींद्र जडेजाने चार विकेट्स मिळवल्या. भारताच्या वेगवान गोलंदाजांना यावेळी एकही विकेट मिळवता आली नाही.
सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या अखेरीस इंग्लंडचे २८८ धावांत ५ फलंदाज माघारी परतले होते. दुसऱया दिवसाच्या खेळाला सुरूवात झाल्याच्या तिसऱयाच षटकात फिरकीपटू आर.अश्विनने इंग्लंडच्या बेन स्टोक्सला माघारी धाडले. अश्विनच्या फिरकीवर स्टोक्स स्लिपमध्ये झेलबाद झाला. अश्विननंतर जडेजाने भारतीय संघाला सातवे यश मिळवून दिले. जडेजाने इंग्लंडच्या वोक्सला तंबूत धाडले. यष्टीरक्षक पार्थिव पटेलने वोक्सचा अप्रतिम झेल टीपला. दरम्यान, इंग्लंडच्या धावसंख्येने ३५० चा आकडा गाठला, तर जोस बटलर याने आपले सहावे आंतरराष्ट्रीय कसोटी अर्धशतक पूर्ण केले. जडेजाने इंग्लंडच्या रशीदला आपल्या अफलातून फिरकीवर क्लीनबोल्ड केले. उपहारापर्यंत इंग्लंडची धावसंख्या ८ बाद ३८५ अशी होती. दुसऱया सत्रात अश्विन आणि जडेजाने प्रत्येकी एक विकेट घेऊन इंग्लंडचा डाव संपुष्टात आणला. जोस बटलरच्या संयमी खेळीमुळे इंग्लंडला चारशेचा आकडा गाठता आला.
तत्पूर्वी, कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या किटन जेनिंग्सने खातेसुद्धा उघडले नव्हते. उमेश यादवच्या चेंडूवर त्याचा गलीमध्ये एकहाती झेल टिपण्यात करुण नायर अपयशी ठरला. पदार्पणाच्या कसोटीत शून्यावर बचावलेल्या किटनने मग पदार्पणातच शतकी खेळी साकारून वडिलांना सलामी दिली. कारण अशाच एका शून्याने किटनला आयुष्यभराला पुरेल, असा धडा शिकवला होता. शून्यातून विश्व उभारणाऱ्या किटनच्या ११२ धावांच्या खेळीच्या बळावर इंग्लंडने चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर ५ बाद २८८ अशी सावध आणि समाधानकारक मजल मारली होती.
रविचंद्रन अश्विनच्या प्रभावी फिरकीच्या बळावर भारताने इंग्लंडला नियंत्रणात ठेवले. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यावर भारतात खेळण्याचा दांडगा अनुभव गाठीशी असणारा संघनायक अॅलिस्टर कुक आणि जेनिंग्स यांनी ९९ धावांची दमदार सलामी दिली. २६व्या षटकात रवींद्र जडेजाकडे विराट कोहलीने चेंडू दिला आणि भारताला पहिले यश मिळाले. कुक ४६ धावांवर माघारी परतला. पुढे जाऊन खेळण्याचा त्याचा प्रयत्न पार्थिव पटेलने यष्टिचीत करून हाणून पाडला. मग जो रूट (२१) फारसा प्रभाव पाडू शकला नाही. त्यानंतर जेनिंग्स आणि मोईन अली यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी केली. अश्विनचे ७१वे षटक महत्त्वाचे ठरले. त्याने दुसऱ्या चेंडूवर मोईनला (५०) आणि चौथ्या चेंडूवर किटनला तंबूची वाट दाखवली. जॉनी बेअरस्टोसुद्धा फारसा प्रभाव पाडू शकला नाही.
Cricket Score, India vs England: दिवसभरातील अपडेट्स
Live Updates
जोस बटलरचा लाँग ऑनवर खणखणीत षटकार
इंग्लंडची नववी विकेट, अश्विनच्या फिरकीवर जेक बॉल झेलबाद
अश्विनकडून निर्धाव षटक
दुसऱया सत्राच्या खेळाला सुरूवात, अश्विन टाकतोय षटक
१२० षटकांच्या अखेरीस इंग्लंड ८ बाद ३६८ धावा. (बटलर- ५७ , बॉल- १९)
जोस बटलरचे ६ वे आंतरराष्ट्रीय कसोटी अर्धशतक पूर्ण
जोस बटलर अर्धशतकच्या उंबरठ्यावर
इंग्लंड ८ बाद ३३४ धावा
रशीद केवळ चार धावांवर माघारी
जडेजाची अफलातून फिरकी, रशीद क्लीनबोल्ड
१०९ षटकांच्या अखेरीस इंग्लंड ७ बाद ३२५ धावा
वोक्स बाद झाल्यानंतर रशीद फलंदाजीसाठी मैदानात
भारतीय संघाला सातवे यश, रवींद्र जडेजाच्या फिरकीवर वोक्स झेलबाद
क्षेत्ररक्षणावेळी विराट कोहलीला दुखापत
जोस बटलरचा मिड विकेटवर चौकार, इंग्लंडच्या धावसंख्येने ३०० चा आकडा गाठला
अश्विनच्या खात्यात आता पाच विकेट्स जमा
आर.अश्विनने घेतली बेन स्टोक्सची विकेट, बेन स्टोक्स स्लिपमध्ये झेलबाद
आजच्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतरच्या तिसऱयाच षटकात भारतीय संघाला सहावे यश
वानखेडे कसोटीच्या दुसऱया दिवसाच्या खेळाला सुरूवात
