विलक्षण इच्छाशक्तीचे प्रतीक असरणाऱया रॉजर फेडरर याने पुन्हा एकदा आपणंच टेनिसचे राजे असल्याचे सिद्ध करून दाखवले. वाढत्या वयावरून नेहमी प्रश्नांच्या गोताळ्यात सापडणाऱया फेडररने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये स्पेनच्या राफेल नदावर मात करून आपल्या टीकाकारांची तोंडं बंद केली. मेहनतपूर्वक जपलेली तंदुरुस्ती, कसोशीने उंचावत नेलेला खेळाचा दर्जा आणि खेळावरचं निस्सीम प्रेम या आपल्या गुणवैशिष्टयांनी फेडररने उंचावलेला टेनिसचा दर्जा आजही कायम राखला. फेडररने आपल्या सर्वोत्तम कामगिरीचा नजाराण पेश करत ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्याच्या चुरशीच्या लढतीत राफेल नदालवर ६-४, ३-६, ६-१, ३-६, ६-३ असा विजय प्राप्त केला. फेडररने या विजयासह आपल्या कारकीर्दीतील १८ ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकण्याचा विश्वविक्रम केला. विशेष म्हणजे, फेडररचा हा ऑस्ट्रेलियन ओपनमधील १०० वा सामना होता. पाच वर्षांनंतर फेडररच्या खात्यात ग्रँडस्लॅमचे विजेतेपद जमा झाले.
जिंकण्याची अविरत उर्मी, अचंबित करणारे सातत्य ही गुणवैशिष्ट्ये असलेले दोन दिग्गज खेळाडू जेव्हा एकमेकांसमोर उभे ठाकतात तेव्हा टेनिस चाहत्यांसाठी एक विलक्षण संधी असते. २०११ नंतर आज पहिल्यांदाच रॉजर फेडरर आणि राफेल नदाल ही कट्टर प्रतिस्पर्ध्यांची लढत टेनिस चाहत्यांना ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये पाहायला मिळाली. संपूर्ण जगाचे फेडरर-नदाल लढतीकडे लक्ष लागून होते. सामन्यात फेडररने आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करत जोशात सुरूवात देखील केली होती. फेडररने पहिला सेट ६-४ ने जिंकून श्रीगणेशा केला होता, तर नदालनेही दुसऱया सेटमध्ये फेडररला जशास तसे प्रत्युत्तर देऊन ३-६ असा विजय प्राप्त केला. मग फेडररने तिसऱया सेटमध्ये घोटीव फटक्यांचा नजराणा पेश करत ६-१ ने वर्चस्व गाजवले. तिसऱया सेटमधील मानहानीकारक पराभवाचा कोणताही मानसिक दबाव निर्माण न होऊ देता नदालने चौथ्या सेटमध्ये चांगली सुरूवात केली आणि सेट ३-६ ने जिंकला देखील. चौथ्या सेटमध्ये दोघांमध्ये अत्युच्च दर्जाची चढाओढ पाहायला मिळाली. पाचव्या आणि निर्णायक सेटमध्ये सामन्याला रोमांचक वळण मिळाले होते. दोघांमध्ये प्रत्येक गुणासाठी कमालीचे द्वंद्व पाहायला मिळाले. फेडररने पाचव्या सेटमध्ये आपल्या पोतडीतील नजाकती फटक्यांचा नजारा पेश करत तब्बल साडेतीन चाललेल्या या लढाईत विजय साजरा केला.
फेडररच्या खात्यात आता तब्बल १८ ग्रँडस्लॅम जमा झाली आहेत. तर राफेल नदालकडे एकूण १४ ग्रँड स्लॅम जेतेपदं आहेत. याआधी या दोघांमध्ये ग्रँड स्लॅम स्पर्धेत असंख्य मॅरेथॉन लढती झाल्या आहेत. तशाच अनुभवाची प्रचिती जगभरातील चाहत्यांना मिळाली. खरंतर हार्ड कोर्टवरच्या लढतीतही नदालकडे ९-७ अशी आघाडी होती. ती आज ९-८ अशी कमी झाली आहे.
Roger Federer vs Rafael Nadal
Live Updates
फेडरर ठरला ऑस्ट्रेलियन ओपनचा विजेता
फेडररची अफलातून सर्व्हिस, जेतेपदासाठी केवळ एका गुणाची गरज
फेडररची निर्णयाक सेटमध्ये ५-३ अशी आगेकूच
फेडररची अफलातून खेळी, तब्बल २६ शॉट्सनंतर फेडररच्या खात्यात गुण
नदालचे जशास तसे प्रत्युत्तर
फेडररची हुशारीने खेळी, नदाल भांबावला
फेडररने घेतली ४-३ ने आघाडी
फेडररची दमदार सर्व्हिस आणि त्यानंतर फोरहँडचे अफलातून फटके
पाचव्या सेटमध्ये फेडरर, नदाल यांच्यात ३-३ अशी बरोबरी
फेडररचेही कमबॅक, एका गुणाची कमाई
नदालची झुंजार खेळी, ३-१ ने आघाडीवर
पाचव्या सेटमध्ये नदाल २-१ ने आघाडीवर
फेडररचे कमबॅक, पाचव्या सेटमध्ये पहिल्या गुणाची कमाई
नदालची २-० ने आघाडी
पाचव्या सेटमध्ये पहिला गुण नदालच्या खात्यात
पाचव्या सेटमध्ये नदालची दमदार सुरूवात
फेडररने मेडिकल टाईम आऊट घेतला
चौथा सेट नदालच्या खिशात, नदालने ६-३ ने सेट जिंकला
फेडररच्या खात्यात एक गुण, नदाल ५-३ ने आघाडीवर
चौथ्या सेटमध्ये चुरशीची लढत, नदाल ५-२ ने आघाडीवर
नदालची अफलातून कामगिरी, तिसऱया सेटमध्ये ४-१ ने आघाडी
नदालच्या खात्यात आणखी एक गुण, ३-१ ने आघाडी
नदालने गुणाची कमाई करत घेतली २-१ ने आघाडी
फेडररचेही प्रत्युत्तर, १-१ ने बरोबरी
चौथ्या सेटमध्ये नदालचा श्रीगणेशा, १-० ने आघाडी
फेडरर ऑन टॉप..तिसरा सेट ६-१ ने जिंकला
फेडररची अफलातून खेळी, ५-१ ने आघाडी
फेडररची आणखी एका गुणाची कमाई, तिसऱया सेटमध्ये ४-१ ने आघाडी
अखेर नदालने खाते उघडले, तिसऱया सेटमध्ये पहिल्या गुणाची कमाई
फेडररची अफलातून खेळी, ३-० ने आघाडीवर