बार्सिलोनाकडून डीपोर्टिव्होचा धुव्वा
बार्सिलोना संघाने ला लिगा स्पर्धेतली पराभवांची मालिका खंडित करत डीपोर्टिव्होला कोरुना संघाचा ८-० असा धुव्वा उडवला. लुइस सुआरेझने झळकावलेला ‘गोलचौकार’ या विजयाचे वैशिष्टय़ ठरले. सततच्या पराभवांमुळे बार्सिलोनाचा जेतेपदाचा मार्ग खडतर झाला होता. मात्र या दमदार विजयासह बार्सिलोनाने जेतेपदासाठी प्रबळ दावेदारी सिद्ध केली आहे.
या विजयासह बार्सिलोनाने गुणतालिकेत अ‍ॅटलेटिको माद्रिदला मागे टाकत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. अ‍ॅटलेटिको माद्रिदने फर्नाडो टोरेसच्या दिमाखदार फॉर्मच्या बळावर अ‍ॅथलेटिक क्लबवर १-० अशी मात केली. रिअल माद्रिदने व्हिलारिअलवर ३-० असा दणदणीत विजय मिळवला.
सुआरेझने ११व्या, २४व्या, ५३व्या आणि ६४व्या मिनिटाला गोल करत बार्सिलोनाच्या विजयाचा पाया रचला. इव्हान रॅकिटीक, लिओनेल मेस्सी, मार्क बारट्रा आणि नेयमार यांनी प्रत्येकी एक गोल करत सुआरेझला उत्तम साथ दिली.
करीम बेन्झेमा, ल्युकास व्हॅझक्युझ आणि ल्युका मोडरिक यांनी केलेल्या प्रत्येकी एका गोलच्या बळावर रिअल माद्रिदने व्हिलारिअलवर ३-० अशी मात केली. मात्र प्रमुख खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो मांडीच्या स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेल्याने रिअल माद्रिदची चिंता वाढली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Luis suarez