* महिला संघाचे जेतेपदावर वर्चस्व
* पुरुष संघाला उपविजेतेपदावर समाधान
पश्चिम विभागीय वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा
समर्थ क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित पश्चिम विभागीय वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महिलांमध्ये महाराष्ट्राने तर पुरुषांमध्ये राजस्थानने जेतेपदावर कब्जा केला. मुलींच्या अंतिम लढतीत महाराष्ट्राने छत्तीसगढवर ३५-१७ अशी मात केली.
प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात झालेल्या या सामन्यात महाराष्ट्राच्या महिला संघाने मध्यंतरालाच १८-८ अशी आघाडी घेतली होती. ही आघाडी कायम राखत महाराष्ट्राने शानदार विजय मिळवला. स्नेहल साळुंखेचा अष्टपैलू खेळ, दीपिका जोसेफच्या सुरेख चढाया, सुवर्णा बारटक्के आणि हर्षला मोरे यांचे भक्कम आणि आक्रमक क्षेत्ररक्षण महाराष्ट्राच्या विजयाचे वैशिष्टय़ ठरले. विभागीय स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून महाराष्ट्राने या स्पर्धेच्या जेतेपदावर वर्चस्व राखले आहे. छत्तीसगढच्या सारिकाने एकाकी झुंज देत पराभवाची पिछाडी भरुन काढण्याचा प्रयत्न केला. परंतु अन्य खेळाडूंची साथ न लाभल्याने छत्तीसगढला पराभवाला सामोरे जावे लागले.
पुरुषांमध्ये महाराष्ट्राला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. राजस्थानने महाराष्ट्राचा २३-१९ असा पराभव केला. वजीर सिंग, जगदीप यांच्या चढाई-पकडीच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर राजस्थानने १८-८ अशी आघाडी घेतली. मध्यंतरानंतर महाराष्ट्रातर्फे नीलेश शिंदे, काशिलिंग आडके यांनी आपला खेळ उंचावत ही पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला. परंतु तो अपयशी ठरला. या जेतेपदासह राजस्थानने गेल्या वर्षी महाराष्ट्राकडून झालेल्या पराभवाचा वचपा काढला.
संग्रहित लेख, दिनांक 17th Dec 2012 रोजी प्रकाशित
महाराष्ट्राच्या पोरी हुशार!
* महिला संघाचे जेतेपदावर वर्चस्व * पुरुष संघाला उपविजेतेपदावर समाधान पश्चिम विभागीय वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा समर्थ क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित पश्चिम विभागीय वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महिलांमध्ये महाराष्ट्राने तर पुरुषांमध्ये राजस्थानने जेतेपदावर कब्जा केला. मुलींच्या अंतिम लढतीत महाराष्ट्राने छत्तीसगढवर ३५-१७ अशी मात केली.

First published on: 17-12-2012 at 01:08 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra girls are intelligent