महाराष्ट्राच्या महिला संघाला गेली अनेक वष्रे अंतिम फेरीत भारतीय रेल्वेचा अडथळा ओलांडण्यात अपयश येत होते, परंतु आता उपांत्य फेरीत हरयाणाचा नवा अडथळा महाराष्ट्रासमोर उभा ठाकल्याचे सलग दुसऱ्या वर्षी सिद्ध झाले. तामिळनाडूमधील त्रिचुनगुड येथे झालेल्या ६२व्या राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पध्रेत गतवर्षीच्याच चुकांची पुनरावृत्ती केल्यामुळे महाराष्ट्राच्या महिलांचे आव्हान संपुष्टात आले.
हरयाणाने सांघिक खेळाचे प्रदर्शन करीत पहिल्या सत्रात ५-३ अशी आघाडी घेतली, त्यानंतर सामन्यावर १६-११ असे प्रभुत्व मिळवत दिमाखात अंतिम फेरीत स्थान मिळवले. या सामन्यात महाराष्ट्राचे आक्रमण आणि बचाव या दोन्ही बाजूंमध्ये मर्यादा स्पष्ट झाल्या. उत्तरार्धात कर्णधार अभिलाषा म्हात्रेने सामना वाचवण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले, परंतु ते अपुरे ठरले.
सेनादलाने पुरुषांमध्ये विजेतेपद मिळवताना हरयाणाला ३४-१६ अशा फरकाने पराभूत केले. याचप्रमाणे भारतीय रेल्वेने आपल्या दर्जाला साजेसा खेळ दाखवत अंतिम सामन्यात हरयाणाला ३३-१७ असे पराभूत करून जेतेपदाला गवसणी घातली.