कर्नाटक ६ बाद २९८
मनीष पांडेच्या दमदार शतकी खेळीच्या बळावर कर्नाटकने रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेच्या पहिल्या दिवशी विदर्भाविरुद्ध ६ बाद २९८ धावा केल्या.
विदर्भाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यानंतर सलामीवीर रॉबिन उथप्पाने के. एल. राहुलसोबत ४९ धावांची सलामी नोंदवली. फैझ फझलने राहुलला (२१) बाद करून विदर्भाला महत्त्वाचे यश मिळवून दिले. मग स्वप्नील बंडिवारने रविकुमार समर्थला (२०) तंबूची वाट दाखवली. उथप्पाने १० चौकारांच्या साहाय्याने ५९ धावांची खेळी साकारली. श्रीकांत वाघने त्याला पायचीत केले. मग मनीष पांडेने हिंमतीने संघाचा डाव सावरला. त्याने नायरसोबत चौथ्या विकेटसाठी १४८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी उभारली. रविकुमार ठाकूरने आपल्या लागोपाठच्या षटकांत अनुक्रमे नायर आणि पांडेला बाद केले. नायरने ८७ चेंडूंत ७ चौकार आणि २ षटकारांसह ५८ धावा केल्या. तर पांडेने १३ चौकार आणि एका षटकारांनिशी १६३ चेंडूंत १०४ धावा केल्या. दिवसातील अखेरच्या चेंडूवर अक्षय वाखरेने श्रेयस गोपाळला (१८) बाद केले. चिदंबरम गौतम १३ धावांवर खेळत आहे. डावखुरा मध्यमगती गोलंदाज ठाकूरने ३५ धावांत २ बळी घेतले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संक्षिप्त धावफलक
कर्नाटक (पहिला डाव) : ८९.५ षटकांत ६ बाद २९८ (मनीष पांडे १०४, रॉबिन उथप्पा ५९, करुण नायर ५८; रविकुमार ठाकूर २/३५)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manish make century