रघुनंदन गोखले (माजी बुद्धिबळपटू आणि प्रशिक्षक)

दुबईमध्ये खेळल्या जात असलेल्या ग्लोबल चेस लीगच्या चौथ्या दिवशी अनेक नाटय़मय घडामोडी झाल्या. ग्रँडमास्टर आनंदच्या गँजेस ग्रँडमास्टर्स संघाने गमावलेली आघाडी आणि मॅग्नस कार्लसनच्या कसेबसे पण चिवटपणे लढून कमावलेली बढत! पण, गँजेस ग्रँडमास्टर्सची एक फेरी शिल्लक आहे आणि ते पाचव्या दिवशी अल्पाइन वॉरियर्सला गाठू शकतात.

अल्पाइन वॉरियर्सचा निसटता विजय

गँजेस ग्रँडमास्टर्सवर विजय मिळवल्यामुळे मुम्बा मास्टर्सकडून सगळय़ांच्याच अपेक्षा वाढल्या होत्या आणि त्यांनी जवळजवळ कार्लसनच्या अल्पाइन वॉरियर्सला खाली खेचलेच होते. मॅक्सिम व्हॅचिएर-लग्रेव्हने साक्षात कार्लसनला पराभूत करून जोरदार सुरुवात केली होती. विदित गुजराथीने अर्जुन एरिगेसीला कैचीत पकडले होते. ग्रिश्चूक विजयासाठी लयीत नसलेल्या गुकेशविरुद्ध जिंकण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. पण, सर्वात सुंदर खेळ केला होता तो कोनेरू हम्पीने! एका घोडय़ाचा बळी देऊन तिने अमेरिकन इरिना क्रूशविरुद्ध मात लावली होती. आता फक्त एका हत्तीचा बळी दिला की डाव हम्पीच्या खिशात होता. पण, अशा वेळी बुद्धिबळाची ही राणी गोंधळून गेली आणि क्रूश बरोबरीवर सुटली. अचानक विदितने पण, अर्जुनला डावात पुनरागमन करू दिले आणि ती लढतही बरोबरीत सुटली. आता सगळय़ांचे लक्ष लागले होते प्रज्ञानंद आणि सिंदारोव्ह सामन्याकडे. अपेक्षेप्रमाणे प्रज्ञानंद कार्लसनच्या मदतीला धावून आला व सिंदारोव्हला पराभूत करून त्याने आपल्या संघाला निसटता का होईना, पण विजय मिळवून दिला.

मुम्बा मास्टर्सचा धक्कादायक विजय

एखाद्या दिमाखात चालणाऱ्या गजराजाला मधेच ठेच लागावी तसेच काहीसे विश्वनाथन आनंदच्या गँजेस ग्रँडमास्टर्स संघाचे झाले आणि अडखळत आणि कसेबसे विजय मिळवणाऱ्या अल्पाइन वॉरियर्स या मॅग्नस कार्लसनच्या संघाने आघाडी घेतली. मुम्बा मास्टर्स विरुद्ध विश्वनाथन आनंदने फ्रान्सचा सुपरस्टार मानला गेलेल्या मॅक्सिम व्हॅचिएर-लग्रेव्हवर चुरशीच्या लढतीत मात केली आणि आता गँजेस ग्रँडमास्टर्स आणखी एक शानदार विजय मिळवणार असे चित्र दिसू लागले. पण, अचानक होत्याचे नव्हते झाले. रिचर्ड रॅपपोर्टसारख्या खंद्या खेळाडूने अचानक वाईट खेळून एक उंट गमावला आणि त्यानंतर उत्कृष्ट खेळाचे प्रात्यक्षिक देत विजय मिळवत अलेक्झांडर ग्रिश्चूकने मुम्बा मास्टर्ससाठी बरोबरी मिळवली. द्रोणावल्ली हरिकाने बेला खोटेनाश्विलीची विजयमालिका खंडित करून मुम्बा मास्टर्सला आघाडी मिळवून दिली. तिकडे जगातल्या क्रमांक एक आणि दोनच्या महिला खेळाडूंमधील लढतीत कोनेरू हम्पी जागतिक बुद्धिबळाची साम्राज्ञी होउ यिफानला नमवून मुम्बा मास्टर्सला जोरदार आघाडी मिळवून देणार असे वाटत होते. मात्र, तिने बरोबरी घेऊन तिच्या संघ सहकाऱ्याचीच नव्हे तर, सर्व प्रेक्षकांची घोर निराशा केली. हम्पी अतिशय वाईट कालखंडातून जात आहे हेच खरे!

कार्लसनची मदार प्रज्ञानंदवर

अल्पाइन वॉरियर्सची सगळी मदार प्रज्ञानंदवर आहे. अतिशय चिवटपणे खेळून प्रज्ञानंद आपल्या संधीची वाट बघत असतो. तो कधीही फार मोठय़ा हल्ल्यांच्या मागे धावत नाही. प्रतिस्पर्धी वेळेअभावी कधी चूक करतो, याची दबा धरून बसलेल्या वाघाप्रमाणे तो प्रतीक्षा करतो आणि संधी मिळताच त्याचा लाभ घेतो. बुद्धिबळ हा अप्रत्याशित खेळ आहे आणि येथे प्रतिस्पर्ध्याने सही करून शरणागती दिल्याशिवाय आपण जिंकलो असे मानता कामा नये. असा या खेळाचा अलिखित नियम आहे. ग्लोबल चेस लीगच्या चौथ्या दिवसाने या नियमाचे प्रात्यक्षिकच घडवले. चिंगारी गल्फ टायटन्सच्या निहाल सरीनच्या हातातोंडाशी विजय आला होता. फक्त शेवटचा घाव घालायचा बाकी होता. तेव्हा वेळ कमी असल्यामुळे पटापट खेळताना निहालने घोडचूक केली आणि अल्पाइन वॉरियर्सच्या प्रज्ञानंदने परिस्थितीचा फायदा उठवत वजिरावजिरी केली आणि निहालला शरण येण्यास भाग पाडले. त्या एका विजयामुळे कार्लसनच्या संघाला पराभवाच्या खाईतून बाहेर पडता आले.