Marcus Stoinis Retirement from ODI ahead Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलिया संघाला एक मोठा धक्का बसला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी संघात असूनही एका खेळाडूने अचानक वनडेतून निवृत्ती जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा अनुभवी खेळाडू मार्कस स्टाइनिस याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, जी आत्तापासून लागू होईल. म्हणजेच आता त्याच्या जागी ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या खेळाडूची निवड करावी लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०२३ च्या वर्ल्ड चॅम्पियन संघातही होता समावेश –

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ सध्या श्रीलंकेत कसोटी मालिका खेळत आहे. यानंतर संघ श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे, जी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असेल. दरम्यान, मार्कस स्टॉइनिसने अचानक वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मार्कस स्टॉइनिसने ऑस्ट्रेलियाकडून ७४ एकदिवसीय सामने खेळले आहेत. २०२३ साली भारतामध्ये वनडे विश्वचषक जिंकणाऱ्या संघातही त्याचा समावेश होता. मात्र, तो टी-२० क्रिकेट खेळत राहणार ही दिलासादायक बाब आहे. म्हणजेच तो लीगमध्ये खेळताना दिसणार आहे.

मार्कस स्टॉइनिस निवृत्तीवर काय म्हणाला?

वनडे क्रिकेटमधून निवृत्तीच्या घोषणेसोबतच मार्कस स्टॉइनिसचे वक्तव्यही समोर आले आहे. ऑस्ट्रेलियासाठी वनडे क्रिकेट खेळणे हा खूप चांगला प्रवास आहे. मैदानावर घालवलेल्या प्रत्येक क्षणाबद्दल तो कृतज्ञ असेल. मार्कस म्हणाला की, ‘हा निर्णय सोपा नव्हता, पण माझा विश्वास आहे की, माझ्यासाठी वनडे सामन्यांपासून दूर जाण्याची आणि माझ्या कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करण्याची ही योग्य वेळ आहे.’ मार्कसने आपल्या वनडे कारकिर्दीत ७१ सामने खेळून १४९५ धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर फक्त एक शतक आहे, जेव्हा त्याने १४६ धावांची नाबाद खेळी खेळली. त्याचबरोबर त्याने सहा अर्धशतके झळकावली आहेत. त्याची सरासरी २६ च्या आसपास आहे. मार्कस त्याच्या संघासाठी देखील उपयुक्त आहे. कारण तो गोलंदाजीतही आपली प्रतिभा दाखवतो. त्याच्या नावावर ४८ विकेट्सही आहेत.

आयपीएलमध्ये पंजाब किंग्जकडून खेळणार –

मार्कस स्टाइनिस आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. यावेळी पंजाब किंग्जने त्याचा समावेश केला आहे. पंजाब किंग्जने त्याला ११ कोटी रुपयांमध्ये करारबद्ध केले आहे. आयपीएलमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे. त्याने ९६ आयपीएल सामने खेळून १८६६ धावा केल्या असून या काळात त्याने ४३ विकेट्सही घेतल्या आहेत. आता मार्कसचे सर्व लक्ष फक्त टी-२० क्रिकेटवर असणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marcus stoinis retirement from odi cricket was in squad of australia champions trophy 2025 squad vbm