सोशल मीडियावर वर्णद्वेषी शेरेबाजी केल्याबद्दल लिव्हरपूलचा आघाडीवीर मारियो बालोटेल्लीने जाहीर माफी मागितली आहे. बालोटेल्लीने ‘इंस्ट्राग्राम’वर टाकलेल्या टिप्पणीची फुटबॉल असोसिएशनकडून चौकशी केली जाणार आहे. या प्रकारानंतर त्याने हे वक्तव्य ‘इंस्ट्राग्राम’वरून काढून टाकले आहे. ‘‘झाल्या प्रकाराबद्दल मी सर्वाची माफी मागतो. या टिप्पणीमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्या सर्वाची मी मनापासून माफी मागतो,’’ असे बालोटेल्लीने सांगितले. लिव्हरपूलनेही या प्रकाराची दखल घेतली आहे. ‘‘आम्ही याविषयी बालोटेल्लीशी चर्चा करणार आहोत,’’ असे लिव्हरपूलकडून सांगण्यात आले. सोशल मीडियावरून जाहीर वक्तव्य करून चाहत्यांच्या भावना भडकवल्याबद्दल बालोटेल्लीला शिक्षा होण्याची शक्यता आहे.