जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धा : पीटीआय, उलान-उदे (रशिया)

साविती बुराचे आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात:- सहा वेळा जगज्जेतेपदावर नाव कोरणारी भारताची नामांकित बॉक्सर एम. सी. मेरी कोम (५१ किलो) हिने रशिया येथे सुरू असलेल्या जागतिक महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत विजयी पंच लगावला. सातव्या जगज्जेतेपदाच्या दिशेने कूच करणाऱ्या मेरी कोमला मात्र विजयासाठी संघर्ष करावा लागला.

मेरी कोमने थायलंडच्या जुटामास जिटपाँग हिला ५-० असा पराभवाचा धक्का दिला. बऱ्याच कालावधीनंतर मेरी कोमने प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भाग घेतला. मणिपूरची छोटय़ा चणीची बॉक्सर असलेल्या मेरी कोमने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा अवलंबला होता, पण तिचे फटके जुटामासपर्यंत पोहोचत नव्हते.  त्यामुळे मेरी कोम काहीशी विचलित झाली होती.

तिसऱ्या मानांकित मेरी कोमला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली होती. त्यानंतर रिंगणात उतरलेल्या मेरी कोमला प्रतिस्पर्धीचा अंदाज घेण्यासाठी पहिल्या तीन मिनिटांचा अवधी लागला. त्यानंतर मेरी कोमने खेळावर नियंत्रण मिळवले.

५१ किलो वजनी गटात पहिल्या जागतिक पदकाची प्रतीक्षा असलेल्या मेरी कोमने दुसऱ्या फेरीत जुटामासला प्रत्युत्तर देत दमदार ठोसे लगावले. तिसऱ्या फेरीतही मेरी कोमने शानदार खेळ करत पाचही पंचांचे मत आपल्या बाजूने मिळवले.

दरम्यान, भारतासाठी निराशाजनक बाब म्हणजे माजी रौप्यपदक विजेती साविती बुरा (७५ किलो) हिला उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यातच गाशा गुंडाळावा लागला. वेल्सच्या दुसऱ्या मानांकित लॉरेन प्राइस हिने सावितीला एकतर्फी लढतीत पराभूत केले.

प्राइस ही युरोपियन सुवर्णपदक विजेती तसेच राष्ट्रकुल विजेती बॉक्सर असून तिच्यासमोर सावितीला निभाव लागणे कठीण होते. पण सावितीने आपल्या क्षमतेनुसार कडवी झुंज दिली, पण प्राइससमोर तिचा निभाव लागला नाही. अखेर पंचांनी प्राइसला ३-१ अशा फरकाने विजयी घोषित केले.