ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फिल हय़ुजेसच्या निधनाबाबत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष शरद पवार यांनी वार्षिक पुरस्कार सोहळ्यामध्ये शोक व्यक्त केला.
‘‘मैदानात अशा दुखापतीच्या घटना दुर्दैवी आणि दुर्मीळ आहेत. क्रिकेटजगतासाठी ही फार दु:खद घटना आहे. आपण एका उदयोन्मुख आणि गुणवान क्रिकेटपटूला गमावले आहे. आमच्याप्रमाणेच क्रिकेट चाहत्यांसाठी हा मोठा धक्का आहे,’’ असे पवार म्हणाले.
फिलला आदरांजली वाहून एमसीएचे उपाध्यक्ष रवी सावंत म्हणाले की, ‘‘सध्या क्रिकेटमध्ये स्पॉट-फिक्सिंगसारख्या काही वाईट घटना घडत आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे याबाबत भाष्य करणे उचित ठरणार नाही, पण मुंबईमध्ये अशा प्रकारे बेशिस्त वर्तन कधीही खपवून घेतले जाणार नाही.’’
यावेळी ईडन गार्डन्समध्ये २६४ धावांची विक्रमी खेळी साकारणाऱ्या रोहित शर्माला खास पुरस्कार देण्यात आला, पण तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असल्याने त्याला हा पुरस्कार स्वीकारता आला नाही. मुंबईचा अनुभवी सलामीवीर वसिम जाफरला रणजी स्पर्धेतील सर्वाधिक धावांसाठी विशेष पुरस्कार देण्यात आला. निवृत्ती पत्करलेल्या अजित आगरकर आणि अमोल मुझुमदार यांनाही या वेळी विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.
अजिंक्य रहाणेला या वेळी सर्वोत्तम फलंदाजासाठीचा तेंडुलकर चषक देण्यात आला, त्याचबरोबर डावखुरा गोलंदाज विशाल दाभोळकरला सर्वोत्तम गोलंदाजीसाठीचा शाव्हाक पाघडीवाला चषक देण्यात आला. यष्टीरक्षक, फलंदाज आदित्य तरेला या वेळी गेल्या हंगामात ५८९ धावा केल्याबद्दल राजाध्यक्ष चषक आणि जलद शतक झळकावल्याबद्दल १५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. त्याचबरोबर पृथ्वी शॉ, सर्फराझ खान आणि १४ वर्षांखालील संघाला सन्मानित करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mca president sharad pawar expresses condolence on hughes death