टोक्यो : ऑस्ट्रेलियाची जलतरणपटू इमा मॅकीअनने रविवारी विश्वविक्रमाची नोंद केली. २७ वर्षीय मॅकीअनने एकाच ऑलिम्पिकमध्ये सात पदके जिंकणारी पहिली महिला जलतरणपटू ठरण्याचा पराक्रम केला. यामध्ये चार सुवर्ण आणि तीन कांस्यपदकांचा समावेश आहे. यापूर्वी २००८च्या ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेच्या नताली कॉगलिनने चार सुवर्णासह सहा पदके जिंकली होती. त्याशिवाय अमेरिकेची जलतरणपटू कॅटी लेडेकीने अखेरच्या दिवशी दोन सुवर्णाची कमाई करताना एकूण चार पदके मिळवली. तिने ८०० आणि १,५०० मीटर फ्री-स्टाइल प्रकारात अजिंक्यपद मिळवले.

बाइल्सची माघार

टोक्यो : अमेरिकेची मातब्बर जिम्नॅस्टिक्सपटू सिमोन बाइल्सने जमिनीवरील कसरती (फ्लोअर एक्सरसाइज) प्रकाराच्या अंतिम फेरीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. बाइल्सने काही दिवसांपूर्वीच मानसिक आरोग्याच्या समस्येमुळे विविध प्रकारांत न खेळण्याचा निर्णय जाहीर केला होता. बाइल्सऐवजी ब्रिटनच्या जेनिफर गॅडिरोव्हाला मुख्य फेरीत प्रवेश मिळाला आहे.

आयरिश बॉक्सिंगपटूला विजयाचा उन्माद भोवला!

टोक्यो : आयरिश बॉक्सिंगपटू एडन वॉल्शला उपांत्यपूर्व सामन्यातील विजयाचा उन्माद भोवला आहे. कारण हा आनंद साजरा करताना त्याच्या पायाच्या घोटय़ाला गंभीर दुखापत झाली. या दुखापतीमुळे त्याच्यावर उपांत्य लढतीसह ऑलिम्पिकमधूनच बाहेर पडण्याची नामुष्की ओढवणार आहे.

नियमभंग करणारे सहा जण हद्दपार

टोक्यो : जॉर्जियाच्या दोन रौप्यपदक विजेत्या क्रीडापटूंसह सहा जणांना करोनाविषयक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ऑलिम्पिक संयोजन समितीने हद्दपार केले आहे. नियम मोडून पर्यटन केल्याप्रकरणी जॉर्जियाच्या दोन ज्युडोपटूंवर कारवाई करण्यात आली आहे.