दोहा : विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील क गटातील पहिल्या सामन्यात अर्जेटिनाच्या झालेल्या पराभवामुळे लक्ष लागून राहिलेला गटातील दुसरा मेक्सिको आणि पोलंड दरम्यानचा सामना बचावाच्या आघाडीवरील जबरदस्त प्रयत्नांमुळे गोलशून्य बरोबरीत राहिला. रॉबर्ट लेवांडोवस्कीकडून हुकलेल्या पेनल्टीची खंत पोलंडला निश्चित वाटली असेल.
मेक्सिकोने तुलनेने अधिक प्रयत्न केले. गोल जाळीच्या दिशेने एकही किक मारू न शकलेल्या पोलंडला ५४व्या मिनिटाला गोल करण्याची नामी संधी साधून आली होती. लेवांडोवस्कीने सुरेख मसुंडी मारली होती. ही चाल पूर्णत्वाला जाणार असे वाटत असताना मेक्सिकोच्या मॉरेनोने लेवांडोवस्कीला शर्ट खेचून खाली पाडले. यानंतर पोलंडने पेनल्टीची मागणी केली. ‘व्हिएआर’ची मदत घेऊन पंचांनी पोलंडला पेनल्टी बहाल देखिल केली. मात्र, त्याचाही फायदा पोलंडला झाला नाही. लेवांडोवस्की उजवीकडून किक मारणार हे हेरून मेक्सिकोचा ३७ वर्षीय अनुभवी गोलरक्षक ओचोआने सुरेख झेप घेत लेवांडोवस्कीची पेनल्टी फोल ठरवली. गेल्या विश्वचषक स्पर्धेतील आपले सातत्य कायम राखत ओचोआने मेक्सिकोचा बचाव अभेद्य राखला, हेच आजच्या सामन्याचे वैशिष्टय़ ठरले.
