Mitchell Starc withdraws from Champions Trophy 2025 for Personal reasons : पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला आता फक्त काही दिवस शिल्लक आहेत. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी, विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढत आहेत. कारण एकामागून एक अनेक खेळाडू बाहेर पडत आहेत. आता या यादीत अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क सामील झाला आहे, ज्याने वैयक्तिक कारणांमुळे स्पर्धेतून आपले नाव मागे घेतले आहे. स्टार्कला वगळणे हे कांगारू संघासाठी धक्क्यापेक्षा कमी नाही. २०२३ मध्ये विश्वचषक जिंकणारा ऑस्ट्रेलिया संघ आता अनेक खेळाडू बाहेर पढल्यानंतर खूपच कमकुवत दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधून बाहेर पडल्यानंतर स्टार्ककडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. स्टार्कने वैयक्तिक कारणांमुळे स्पर्धेतून माघार घेतली असली तरी, काही लोकांना वाटते की पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळणे सुरक्षित नाही आणि म्हणूनच त्याने स्पर्धेतून माघार घेतली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्टार्कच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले आहे. बोर्डाने म्हटले, ‘आम्ही त्याच्या निर्णयाचा आदर करतो. दुखापत असूनही स्टार्कने अनेक वेळा देशाला प्राधान्य दिले आहे. त्याची अनुपस्थिती आमच्यासाठी मोठा धक्का आहे, परंतु त्यामुळे दुसऱ्या खेळाडूला प्रभावित करण्याची संधी मिळते.’

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये स्मिथ कर्णधार असेल, संघात ५ बदल –

पॅट कमिन्स घोट्याच्या दुखापतीतून बरा होऊ शकला नाही. २०२४-२५ च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान कमिन्सलाही या समस्येचा त्रास झाला होता. तर हेझलवुडला कंबरेचा त्रास होता. याशिवाय, मिचेल मार्शला दुखापतीमुळे आधीच बाहेर ठेवण्यात आले आहे. तर मार्कस स्टॉइनिसने अचानक एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. याचा अर्थ ऑस्ट्रेलियन संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी संघात एकूण पाच बदल करावे लागले आहेत.

आता शॉन अ‍ॅबॉट, बेन द्वारशुइस, स्पेन्सर जॉन्सन, जेक-फ्रेझर मॅकगर्क आणि तनवीर संघा यांना चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियन संघात स्थान देण्यात आले आहे. शॉन अ‍ॅबॉट, बेन द्वारशुइस आणि स्पेन्सर जॉन्सन हे वेगवान गोलंदाज आहेत. तन्वीर संघा हा भारतीय वंशाचा लेग स्पिनर आहे. तर फ्रेझर-मॅकगर्क हा एक सलामीवीर फलंदाज आहे. दुसरीकडे, २१ वर्षीय फिरकी गोलंदाज अष्टपैलू कूपर कॉनोलीला राखीव खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करेल.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाचा सुधारित संघ:

स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), शॉन अ‍ॅबॉट, अ‍ॅलेक्स केरी, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, अ‍ॅडम झाम्पा. राखीव खेळाडू: कूपर कॉनोली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mitchell starc withdraws from champions trophy 2025 for personal reasons from australia squad vbm