Mohammad Siraj Breaks Stump IND vs SA 1st Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना रोमांचक वळणावर आला आहे. भारताने द. आफ्रिका संघाला दुसऱ्या डावात १५३ धावांवर सर्वबाद केलं आहे. यासह भारताला विजयासाठी १२३ धावांची गरज आहे. पण तत्पूर्वी मोहम्मद सिराजने घेतलेल्या विकेटने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. सिराजने हार्मरला क्लीन बोल्ड करत स्टंपचेही दोन तुकडे केले आहेत. ज्याचा व्हीडिओ आता व्हायरल होत आहे.

कार्बिन बॉश व तेंबा बावुमा यांनी दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी करत संघाचा डाव सावरला. दुसऱ्या दिवसाच्या अखेरपर्यंत दक्षिण आफ्रिकेने ७ विकेट्स गमावत ९१ धावा केल्या होत्या. यानंतर कार्बिन बॉश व तेंबा बावुमा यांनी ४० अधिक धावांची भागीदारी रचत संघाला महत्त्वपूर्ण धावसंख्येपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. पण बुमराहने बॉशला बाद केलं, यानंतर आलेला हार्मरही चांगली फलंदाजी करत होता.

सिराजच्या रॉकेट चेंडूवर हार्मर असा झाला क्लीन बोल्ड, पाहा VIDEO

कर्णधार तेंबाने १२४ चेंडूत ५१ धावा करत अर्धशतक झळकावलं. तर दुसऱ्या टोकाने हार्मर चांगली फलंदाजी करत तेंबाला साथ देत होता. पण सिराजच्या ५४व्या षटकातील पहिल्या चेंडूवर हार्मर क्लीन बोल्ड झाला. सिराजने टाकलेला चेंडू हार्मर नीट समजू शकला नाही आणि त्याने खेळण्याऐवजी तो चेंडू सोडला, जो थेट ऑफ स्टंपवर जाऊन आदळला. सिराजचा हा रॉकेट चेंडू ऑफ स्टंपवर आदळल्यानंतर स्टंपच्या वरच्या भागाचे दोन तुकडे झाले. तर हार्मरही थेट माघारी निघून गेला.

मोहम्मद सिराजच्या या रॉकेट चेंडूचा आणि विकेटचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. हार्मरने सिराजने टाकलेला सोडून मोठी चूक केली. हार्मरने चेंडू सोडल्याने तो थेट स्टंपवर जाऊन आदळला आणि यानंतर सिराजने षटकातील अखेरचा चेंडू यॉर्कर टाकत केशव महाराजला पायचीत केलं आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ सर्वबाद झाला.

तेंबा बावुमा एका टोकाला पाय रोवून उभा राहत संघाचा डाव त्याने एकट्याने सावरला होता, पण इतर फलंदाजांकडून साथ न मिळाल्याने संघ लवकर सर्वबाद झाला.