जागतिक क्रमवारीतील माझे यश युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरावे आणि जास्तीत जास्त तरुण खेळाडूंनी खेळात कारकीर्द घडवावी असे मत टेनिसपटू सानिया मिर्झाने व्यक्त केले. चार्ल्सटन टेनिस स्पर्धेच्या जेतेपदासह सानियाने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली. दुहेरीच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारी सानिया पहिली महिला भारतीय टेनिसपटू ठरली.
या स्पर्धेनंतर लगेचच हैदराबाद येथे होणाऱ्या फेड चषक स्पर्धेत सानिया भारताचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळे विजयाचा आनंद साजरा करायला सानियाला वेळ मिळाला नाही आणि काही तासातच तिचे भारतात आगमन झाले.
विमानतळावर मोठय़ा प्रमाणावर जमलेल्या चाहत्यांनी सानियाचे आगमन होताच एकच जल्लोष केला.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवण्याची भावनाच सुखावणारी आहे. जगातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून मायदेशी परतणे अद्भुत आहे. अथक मेहनत आणि खूप साऱ्या गोष्टींचा त्याग केल्यामुळेच हे ऐतिहासिक यश प्रत्यक्षात साकारले आहे. सायना आणि मी अवघड वाटणारी गोष्ट प्रत्यक्षात साकारली आहे. आमच्या कारर्कीदीतून प्रेरणा घेत जास्तीत जास्त खेळाडूंनी खेळांचा कारकीर्द म्हणून विचार करावा.
– सानिया मिर्झा, भारतीय टेनिसपटू