भारतीय संघ २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभूत झाला. त्या सामन्यात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी धावबाद झाला आणि भारताच्या विजयाच्या आशा मावळल्या. या सामन्यानंतर धोनी निवृत्तीची घोषणा करेल, असा अंदाज क्रिकेटवर्तुळात व्यक्त करण्यात येत होता. पण धोनीने ते अद्याप तरी केलेले नाही. धोनीला सन्मानाने निवृत्ती घेण्याचा सल्ला टीम इंडियाच्या निवड समितीने दिल्याचे सांगण्यात आले होते. तसेच वन-डे संघात आता धोनी यष्टीरक्षक म्हणून पहिली पसंती नसेल असेही स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर भारताच्या फलंदाजी प्रशिक्षकाने एक महत्त्वाची माहिती दिली.
भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी स्पोर्ट्सकीडाला मुलाखत दिली. त्यावेळी त्याने धोनी आणि एकूणच संघातील खेळाडूंची निवड याबाबत महत्त्वाची माहिती दिली. “धोनीच्या जागी ऋषभ पंतला संघात घेण्यात आलं. मागच्या वर्षभरात त्याची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. तरीदेखील त्याला संघ व्यवस्थापनाचा पाठिंबा आहे. आम्हाला विश्वास आहे की त्या खेळाडूमध्ये प्रतिभा आहे. तो चांगल्या लयीत परतला तर तो संघासाठी अनेक चांगल्या खेळी खेळू शकतो, म्हणून त्याला संघात स्थान दिले जात आहे”, असे विक्रम राठोड म्हणाले.
“धोनी अजूनही क्रिकेट जगतात आहे. त्याच्यासंदर्भात काय निर्णय घेण्यात येणार आहे ते आम्हाला आता तरी माहिती नाही. त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकीर्द पाहिली, तर त्याच्यासारख्या खेळाडूला पर्याय शोधणं हे कधीच सोपं नव्हतं आणि यापुढेही नसेल. ऋषभ पंत सध्या लयीत नसल्याने त्याच्यावर चांगली कामगिरी करून दाखवण्याचं दडपण आहे. पण अशा गोष्टीतूनच खेळाडूने बळकट व्हायला शिकलं पाहिजे”, असेही ते म्हणाले.