काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या इंडियन सुपर लीग स्पर्धेसाठीच्या तिकीट विक्रीला सुरुवात झाली असून मुंबई सिटी फुटबॉल क्लबच्या तिकीट विक्रीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुंबई सिटीच्या तिकीट विक्रीला ‘बुकमायशो’ या संकेतस्थळावर मंगळवारपासून सुरुवात झाली असून तिकिटांना जोरदार मागणी असल्याचे मुंबई संघाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबई सिटीचे घरच्या मैदानावरील सामने नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार असून पहिला सामना १८ ऑक्टोबर रोजी पुणे सिटी एफसीविरुद्ध होणार आहे. या सामन्यांसाठी तिकिटांचे दर १२५, २००, २५० आणि ३५० रुपये असे ठेवण्यात आले आहेत. व्हीव्हीआयपी स्टँडमधील तिकीटांचे दर २५०० रुपये इतके ठेवण्यात आले आहेत. निकोलस अनेल्का, फ्रेडिक लुमबर्ग या दिग्गज फुटबॉलपटूंचा खेळ पाहण्याची संधी सर्वाना मिळावी, यासाठी तिकिटांचे दर कमी ठेवण्यात आले आहेत. नवी मुंबईतील फुटबॉलप्रेमींनी पहिल्या दिवशी तिकीट विक्रीला उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला आहे. लवकरच काही दिवसांत स्टेडियमवरील तिकीटविक्रीला सुरुवात होईल, असे मुंबई सिटी एफसीकडून सांगण्यात आले.
उद्घाटन सोहळ्यात प्रियांका चोप्राचा जलवा
कोलकातामधील सॉल्ट लेक स्टेडियमवर होणाऱ्या इंडियन सुपर लीगच्या उद्घाटन सोहळ्यात बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचा जलवा पाहण्याची संधी फुटबॉलचाहत्यांना मिळणार आहे. १२ ऑक्टोबरला संध्याकाळी सहा वाजता होणाऱ्या या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण स्टार नेटवर्कच्या आठ वाहिन्यांवरून केले जाणार आहे. २०० मुला-मुलींचा सहभाग असलेले आणि त्यात ६०० फुटबॉलचा वापर केलेले नृत्य या सोहळ्याचे आकर्षण असणार आहे. १६० भारतीय संगीतकार आणि संगीत क्षेत्रातील आठ दिग्गजांची अदाकारी या वेळी पाहायला मिळणार आहे. परदेशी आणि भारतीय फुटबॉलमधील गुणवत्ता दर्शवणारा एक व्हिडियो या वेळी दाखवण्यात येणार आहे. त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हस्ते आयएसएलचे अधिकृतपणे उद्घाटन होईल.
सर्व फुटबॉलपटूंचा विमा
पणजी : आयएसएलमधील आठही फ्रँचायझींनी सर्व खेळाडूंचा विमा उतरवला आहे. खेळाडूंचे मानधन, अपघात, वैद्यकीय उपचार, प्रवास या सर्व बाबतचा समावेश विम्यात करण्यात आला आहे. विम्याची ही रक्कम जवळपास ६०० कोटी रुपये इतकी आहे. यापूर्वी इंडियन प्रीमिअर लीगसाठी ११०० कोटी, २०१०मधील राष्ट्रकुल स्पर्धेसाठी २०० कोटी आणि बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवरील इंडियन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीसाठी ५०० कोटी रुपयांचा विमा उतरवण्यात आला होता. ‘‘देशात फुटबॉलपटूंसाठी प्रथमच विमा उतरवण्यात आला आहे. सराव किंवा सामन्यादरम्यान खेळाडू जायबंदी झाल्यास, त्याला फ्रँचायझीकडून संपूर्ण मानधन मिळणार नाही. त्याऐवजी विमा कंपनीकडून त्या खेळाडूला मानधनाची रक्कम दिली जाईल,’’ असे आयएसएलकडून सांगण्यात आले.