मुंबईकर क्रिकेटपटू वसीम जाफर याची बांगलादेश क्रिकेट संघाच्या फलंदाजी मार्गदर्शक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या हाय परफॉर्मन्स युनिटसोबत तो श्रीलंका दौऱ्यासाठी बांगलादेश संघाला फलंदाजीचे धडे देणार आहे. त्याबरोबरच चंपका रामनायका याला बांगलादेश संघाच्या गोलंदाजी मार्गदर्शक पदी नियुक्त करण्यात आले आहे. स्टीव्ह ऱ्होड्स यांच्या गच्छंतीनंतर बांगलादेशचा संघ मुख्य प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ़च्याही प्रतीक्षेत आहे.
बांगलादेशचे सध्याचे फलंदाजी मार्गदर्शक नील मॅकेन्झी यांनी त्यांच्या कराराचे नूतनीकरण केले नाही. बांगलादेश संघाच्या श्रीलंका दौऱ्यासाठी ते उपलब्ध असणार नाहीत. “आमच्या संघाच्या प्रशिक्षकपदासाठी आम्ही उमेदवार शोधत आहोत. आम्हाला कोणत्या प्रकारचे प्रशिक्षक मिळतील त्यावर त्यांची नियुक्ती किती कालावधीत होईल हे समजेल”, असे बांगलादेश क्रिकेट ऑपरेशन विभागाचे अध्यक्ष अक्रम खान यांनी सांगितले.
“चंपका रामनायका हे अत्यंत प्रतिभावान गोलंदाजी प्रशिक्षक आहेत. त्यांच्या नावाचा गोलंदाजाई प्रशिक्षक म्हणून विचार सुरू आहे. सध्या आम्हीच त्यांना मार्गदर्शक म्हणून श्रीलंका दौऱ्यावर घेऊन जात आहोत. श्रीलंकेत दहशतवादी हल्ला झाल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव आमच्या प्रशिक्षक वृंदांपैकी काहींनी श्रीलंका दौऱ्यापुरती विश्रांती मागितली आहे. जर मॅकेन्झी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून करार वाढवू इच्छित नसतील तर आम्ही वसीम जाफर यांना फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करू. आता करण्यात आलेल्या नियुक्ती या कोणाच्याही जागी नसून त्यांना अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलेला आहे”, अशी माहितीही त्यांनी दिली.