१९ ग्रँडस्लॅम विजेतेपदे पटकावणारा स्पेनचा टेनिसपटू राफेल नदाल याला पुन्हा एकदा दुखापतीला सामोरे जावे लागले. त्यामुळे ओटीपोटातील स्नायू ताणले गेल्यामुळे नदालने पॅरिस मास्टर्स स्पर्धेतून माघार घेतली आहे.
३३ वर्षीय नदालने या मोसमात अनेकदा दुखापतींचा सामना करावा लागला. त्यामुळे त्याच्या एटीपी टूर फायनल्स आणि डेव्हिस चषक स्पर्धेतील समावेशावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘‘एटीपी टूर फायनल्स या मोसमातील अखेरच्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्यासाठी मी उत्सुक असलो तरी दुखापतीमुळे आता ते अशक्य वाटत आहे. दुखापतीतून बरे होण्यासाठी मी लवकरच मायदेशी प्रयाण करणार आहे,’’ असे नदालने सांगितले.
आता पुढील वर्षी महत्त्वाच्या स्पर्धा असल्यामुळे नदालला लवकरात लवकर बरे व्हावे लागणार आहे. ऑस्ट्रेलियन खुली ग्रँडस्लॅम स्पर्धा तसेच टोक्यो ऑलिम्पिक आणि विम्बल्डन स्पर्धा नदालला खुणावत आहेत.
जोकोव्हिचला जेतेपद
पॅरिस : नोव्हाक जोकोव्हिचने पॅरिस मास्टर्स लीग स्पर्धेमध्ये पाचवे विजेतेपद पटकावले. रविवारी रंगलेल्या अंतिम फेरीत त्याने कॅनडाचा युवा टेनिसपटू शापोवालोव्हचा अंतिम फेरीत
६-३, ६-४ असा पराभव केला. उपांत्य फेरीतून राफेल नदालने माघार घेतल्यामुळे शापोवालोव्हने अंतिम फेरीत मजल मारली होती. गेल्या आठवडय़ात जागतिक क्रमवारीत जोकोव्हिचने आपले अग्रस्थान गमावले होते आणि नदाल पहिल्या स्थानावर गेला होता. मात्र जोकोव्हिचने सलग सहाव्या वर्षी जगातील सर्वोत्तम टेनिसपटू बनण्याचा मान मिळवत पीट सॅम्प्रासच्या विक्रमाशी बरोबरी साधली.
