गगनदीपसिंग (वरिष्ठ) याने केलेल्या चार गोलांमुळेच नामधारी इलेव्हनने वरिष्ठ राष्ट्रीय हॉकी स्पर्धेतील ‘ब’ श्रेणी विभागात अजिंक्यपद पटकाविले. त्यांनी अंतिम लढतीत पतियाळा संघाचा ५-१ असा सहज पराभव केला. तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात चंडिगढ संघाने हिमाचल प्रदेश संघावर ५-२ अशी मात केली.
शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेत नामधारी संघाने पूर्वार्धात ३-१ अशी भक्कम आघाडी मिळविली होती. सहाव्या मिनिटाला त्यांच्या गगनदीपने गोल करीत संघाचे खाते उघडले. १२व्या मिनिटाला पतियाळा संघाच्या अनिलकुमार याने गोल करीत १-१ अशी बरोबरी साधली. मात्र १६व्या मिनिटाला पुन्हा गगनदीपने गोल करीत २-१ अशी आघाडी मिळविली. तेथून त्याच्या संघाने सामन्यात निर्विवाद वर्चस्व गाजविले. अवतारसिंग याने २५व्या मिनिटाला गोल करीत नामधारी संघाची आघाडी ३-१ अशी केली. उत्तरार्धात गगनदीप याने ४८व्या व ५२व्या मिनिटाला गोल करीत संघास ५-१ अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. ही आघाडी पतियाळा संघास तोडता आली नाही.

गगनदीप आणि योगायोग
या स्पर्धेत गगनदीपसिंग या नावाचे दोन खेळाडू आहेत. नामधारी संघाबरोबरच चंडिगढ संघातही त्याच नावाचा खेळाडू आहे. योगायोग म्हणजे अंतिम दिवशी या दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी चार गोल करीत आपल्या संघास विजय मिळवून दिला. या दोघांनाही सामनावीर पारितोषिक मिळाले. मात्र दोन्ही खेळाडूंना हॅट्ट्रिक करण्यात अपयश आले. कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत चंडिगढ संघाने निर्विवाद वर्चस्व गाजविले. त्यांनी हिमाचलविरुद्ध पूर्वार्धात ४-२ अशी आघाडी मिळविली होती. त्या वेळी गगनदीपसिंग याने ८व्या, २१व्या, २४व्या व ५१व्या मिनिटाला गोल केले. रंजोधसिंग याने २२व्या मिनिटाला गोल करीत त्याला चांगली साथ दिली. हिमाचल संघाकडून नौरवीकुमार याने ७व्या मिनिटाला गोल केला तर विनोद डोग्रा याने १८व्या मिनिटाला गोल नोंदविला. या स्पर्धेतील ‘अ’ श्रेणी विभागाच्या सामन्यांना गुरुवारपासून प्रारंभ होत आहे.