वरिष्ठ गटाची ४६ वी राष्ट्रीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धा बारामती येथे ८ ते १२ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत पुरुष गटात ३४ तर महिलांमध्ये ३३ संघ सहभागी होणार आहेत. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या क्रीडांगणावर होणाऱ्या या स्पर्धेसाठी पाच मैदाने तयार केली जाणार असून त्यापैकी दोन मैदाने मॅटची असणार आहेत. खो-खो या खेळाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिकाधिक प्रसार व्हावा, यासाठीच मॅटवरील सामने आयोजित केले जाणार आहेत. सामने प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने होणार आहेत.
दोन्ही गटातील विजेत्या संघांच्या संबंधित राज्य संघटनेला दोन लाख रुपये तर संघातील प्रत्येक खेळाडूला १० हजार रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाणार आहे. उपविजेत्या संघांच्या संघटनेला दीड लाख रुपये तर संघातील प्रत्येक खेळाडूस सात हजार रुपयांचे बक्षीस मिळेल. तिसऱ्या क्रमांकांच्या संघास एक लाख व संघातील प्रत्येक खेळाडूला पाच हजार रुपयांचे बक्षिस देण्यात येईल. तसेच सवरेत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूला १५ हजार, सवरेत्कृष्ट आक्रमण व संरक्षणाकरिता प्रत्येकी १० हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे.
 संघांची गटवार विभागणी
पुरुष : अ गट- रेल्वे, दिल्ली, गोवा, आसाम, मध्य प्रदेश. ब गट- महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, अंदमान व निकोबार, सिक्कीम. क गट- आंध्र प्रदेश, विदर्भ, ओदिशा, नागालँड. ड गट- कर्नाटक, पुद्दुचेरी, चंडीगढ, जम्मू व काश्मीर. इ गट- केरळ, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तरांचल. फ गट- छत्तीसगड, मध्य भारत, राजस्थान, मणिपूर. ग गट- कोल्हापूर, तेलंगण, झारखंड, हिमाचल प्रदेश. ह गट- पश्चिम बंगाल, हरियाणा, त्रिपुरा, बिहार.
महिला : अ गट- महाराष्ट्र, तामिळनाडू, चंडीगढ, सिक्कीम, त्रिपुरा. ब गट- केरळ, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश. क गट- आंध्र प्रदेश, ओदिशा, छत्तीसगड, जम्मू व काश्मीर. ड गट- पुद्दुचेरी, दिल्ली, बिहार, आसाम. इ गट- विदर्भ, तेलंगण, गोवा, अंदमान व निकोबार. फ गट-पंजाब, कोल्हापूर, झारखंड, उत्तराखंड. ग गट- कर्नाटक, मध्यभारत, राजस्थान. गुजरात. ह गट-पश्चिम बंगाल, हरियाणा, मणिपूर. नागालँड.