नेदरलँड्स आणि अर्जेटिना हे फुटबॉलविश्वातील दोन्ही मातब्बर संघ. दोन्ही संघांना फुटबॉलचा प्रदीर्घ वारसा. दोन्ही संघ विश्वविजेतेपदाचे प्रबळ दावेदार. विश्वचषकाचे एकेक टप्पे पार करत हे दोन्ही संघ उपांत्य फेरीत एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. मुकाबला अटीतटीचा होणार हे नक्कीच. जेतेपद केवळ दोन विजयांच्या अंतरावर साद घालते आहे. त्यामुळे सर्वोत्तम प्रदर्शन करत अंतिम फेरीत धडक मारण्याचा दोन्ही संघांचा इरादा आहे. दोन संघांमधील, दोन शैलींमधील आणि दोन प्रशिक्षकांमधील ही लढत दर्जेदार खेळाची अनुभूती देणारी असेल.
अर्जेटिनासाठी लिओनेल मेस्सी महत्त्वाचा आहे. सार्वकालीन महान खेळाडूंमध्ये मेस्सीचा समावेश झाला आहे. या यादीत गुणवत्तेच्या बळावर स्थान पटकावल्याचे मेस्सीने सिद्ध केले आहे. जगातल्या सर्वोत्तम ड्रिब्लर्समध्ये मेस्सीचा समावेश होतो. मेस्सीला रोखण्यासाठी प्रतिस्पर्धी संघ तीन ते चार बचावपटूंची व्यवस्था करतो. मात्र या सर्वाना चकवत, चेंडूवर नियंत्रण मिळवून तो स्वत: गोल करतो किंवा गोल करण्यासाठी साहाय्य करतो. त्याच्या या क्षमतेला प्रतिस्पर्धी खेळाडू वचकून असतात. त्यामुळे त्याच्यावर थेट हल्लाबोल करण्याऐवजी त्याचा खेळ संथ करण्याचे उद्दिष्ट असते. अर्जेटिनाचे डावपेच मेस्सीभोवती आधारलेले असतात. मेस्सीला रोखले की अर्जेटिनाच्या नाडय़ा आवळल्या जातात, हे माहिती असल्याने नेदरलँड्सही मेस्सीला थोपवण्यासाठी विशेष रणनीती राबवण्याची शक्यता आहे. मात्र सगळे लक्ष मेस्सीवर केंद्रित केल्यास अर्जेटिनाचे बाकी खेळाडू गोल करू शकतात. त्यामुळे नेदरलँड्सवर दुहेरी जबाबदारी आहे.
मेस्सीला रोखतानाच सामन्याच्या सुरुवातीच्या क्षणांमध्येच गोल करत अर्जेटिनावर दडपण आणण्याचा नेदरलँड्सचा प्रयत्न असणार आहे. आर्येन रॉबेन आणि रॉबिन व्हॅन पर्सी या दोघांवर नेदरलँड्सची भिस्त आहे. सातत्याने चेंडूवर ताबा मिळवत गोल करण्यासाठी ते शर्थीचे प्रयत्न करतात. तिशी ओलांडलेला रॉबेनचा उत्साह आणि त्याचा झंझावात अर्जेटिनासाठी डोकेदुखी ठरू शकतो. आक्रमण आणि कलात्मकता याचा सुरेख मिलाफ व्हॅन पर्सीच्या खेळात पाहायला मिळतो. मोठय़ा स्पर्धेच्या शेवटच्या सामन्यांमध्ये गोल करता न येण्याचा इतिहास बाजूला सारण्याचा व्हॅन पर्सीचा प्रयत्न असेल. अल्पावधीत आघाडी मिळवण्यासाठी नेदरलँड्सचा संघ प्रसिद्ध आहे. बहुतांशी लढतीत त्यांनी दमदार संघांविरुद्ध हे तंत्र अवलंबले आहे. दुसरीकडे अर्जेटिनाच्या गटात सोपे संघ असल्याने त्यांनी दुबळ्या संघांचा अडथळा पार केला आहे. मोठे संघ छोटय़ा संघांविरुद्ध सर्व ताकदीनिशी खेळत नाहीत. मात्र आता नेदरलँड्सच्या रुपात बलाढय़ संघ समोर असल्याने अर्जेटिनाला आपली सर्व अस्त्रे परजावी लागणार आहेत.
या सामन्याच्या निमित्ताने मेस्सी विरुद्ध रॉबेन आणि व्हॅन पर्सी हे डावखुरे खेळाडू एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. डाव्या पायाने गोल करण्याची त्यांची हातोटी प्रतिस्पर्धी गोलरक्षकांना चकवू शकते. या त्रिकुटापैकी कोण आपल्या संघाला डाव्या पायाने गोल करत विजय मिळवून देतो, हे पाहणे रंजकतेचे ठरणार आहे.