युवा खेळाडूंवर भर देत खेळणाऱ्या भारतास अझलान शाह चषक हॉकी स्पर्धेत शनिवारी येथे बलाढय़ ऑस्ट्रेलियाच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे.  भारताने कर्णधार सरदारा सिंग, एस. व्ही. सुनील, व्ही. आर. रघुनाथ यांच्यासह संघातील सहा आंतरराष्ट्रीय खेळाडूंना विश्रांती दिली आहे. आगामी युवा विश्वचषक स्पर्धा लक्षात घेऊन भारताने संघात अधिकाधिक युवा खेळाडूंना संधी दिली आहे. चेहरा मोहरा बदललेल्या भारताला सहा वेळा विजेतेपद मिळविणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या लढतीत विजयासाठी सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे. दानिश मुज्तफा याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ उतरला आहे. संघाची मुख्य मदार मनदीप सिंग, मलक सिंग, गुरजिंदर सिंग, गुरमेल सिंग, अमित रोहिदास, पी. टी. राव व सुशांत तिर्की यांच्यावर आहे.
युवा खेळाडूंच्या विश्वचषक स्पर्धेसाठी येथील अनुभवाचा फायदा आमच्या खेळाडूंना मिळेल व चांगला संघ बांधला जाईल याच दृष्टीने आम्ही युवा खेळाडूंना येथे अधिकाधिक संधी दिली आहे, असे भारताचे प्रशिक्षक मायकेल नॉब्स म्हणाले. भारताला त्यानंतर दक्षिण कोरिया (१० मार्च), पाकिस्तान (१२ मार्च), गतविजेता न्यूझीलंड (१६ मार्च) यांच्याशी खेळावे लागणार आहे.