ऋषिकेश बामणे

बॅडमिंटनमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून महिला खेळाडूंनी पुरुषांच्या तुलनेत उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये (पीबीएल) महिलांच्या सामन्यांची संख्या अधिक असावी, असे मलाही वाटते. परंतु चाहत्यांच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास पुरुषांचेच सामने अधिक रंगतदार होत असल्याने गेली अनेक वर्षे हीच परंपरा कायम राखण्यात आली आहे, असे मत माजी बॅडमिंटनपटू अपर्णा पोपट यांनी व्यक्त केली.

प्रीमियर लीगच्या सामन्यांमध्ये पुरुष एकेरीचे दोन, तर महिला एकेरी, पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरीचा प्रत्येकी एक सामना खेळवण्यात येतो. ‘‘सामन्यांच्या रुपरेषेविषयी गेली अनेक वर्षे वादविवाद सुरू होते, त्यामुळे आता त्याविषयी मी फार काही बोलू इच्छित नाही. निश्चितच महिलांचा एखादा सामना नक्कीच वाढवता येऊ शकतो, असे मला वाटते. परंतु या स्पर्धेत पुरुष एकेरी अथवा दुहेरीचेच सामने सर्वाधिक रंगतात. त्याशिवाय स्टेडियममध्ये येणाऱ्या आणि टीव्हीवर पाहणाऱ्या चाहत्यांनासुद्धा तीन गेमपर्यंत लांबलेले सामने पाहायला आवडतात. त्यामुळे नियमांत बदल करण्यासाठी आणखी काही हंगाम तरी नक्कीच प्रतीक्षा करावी लागेल,’’ असे अपर्णा यांनी सांगितले.

भारतीय बॅडमिंटनपटूंच्या सध्याच्या कामगिरीचे विश्लेषण करताना अपर्णा म्हणाल्या, ‘‘सिंधू-सायना यांच्यावरच भारताला आता अधिक काळ विसंबून राहणे धोक्याचे असून ज्याप्रमाणे पुरुष दुहेरीत आणि एकेरीत अनेक युवा मुले घडत आहेत, त्याप्रमाणेच मुलींनीही आंतरराष्ट्रीय पातळीवर चमक दाखवण्याची गरज आहे.’’

‘पीबीएल’सारख्या व्यासपीठामुळे भारतालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला नामांकित खेळाडूंचा खेळ जवळून पाहण्याची संधी मिळाली. त्यामुळे या लीगने खेळाडू घडवण्याची प्रकिया सुरू ठेवावी, असेही अपर्णा यांनी नमूद केले.