नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असा प्रांत म्हणजे बिहार. याच बिहारची विलग झालेली शाखा अर्थात झारखंड. कोळसा, खाणी आणि त्यावर आधारित आयुष्य यावर बेतलेला ‘गँग्स ऑफ वासेपूर’ चित्रपट चार वर्षांपूर्वी आला होता. मॉल, मल्टिप्लेक्स, विदेशी ब्रॅण्ड या चंगळवादी इंडियाला या चित्रपटाच्या निमित्ताने राबणाऱ्या, वंचित, उपेक्षित भारतातल्या माणसांची कहाणी अनुभवायला मिळाली.
वासेपूर चित्रपटात दाखवल्याप्रमाणे तिरंदाज लक्ष्मीराणी माझीचे वडील कोळसाच्या खाणीत कामाला आहेत. धूर, धूळ यांनी भरलेली दुनिया, आरोग्याची होणारी हेळसांड, हातावर असलेले पोट असे हे विश्व. वासेपूर चित्रपट पाहताना लक्ष्मीराणीला वडिलांचे आणि पर्यायाने आपलेच आयुष्य बघतोय असे वाटून गेले. चार वर्षांनंतर या चित्रात मोठा बदल झाला आहे. नकाशात एका ठिपक्याचे अस्तित्व असणाऱ्या झारखंडच्या बागुला गावात जन्मलेली लक्ष्मीराणी माझी रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. तिच्या बाबांना कार्यालयात बढती मिळाली आहे. सुरक्षेचं पिवळं हेल्मेट परिधान करून भूगर्भात साधनसंपत्तीच्या उत्खननाऐवजी या कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. लक्ष्मीराणी आता पश्चिम बंगालमधल्या चित्तरंजन शहरात राहते. क्रीडापटूंना आपल्या सेवेत सामावून घेणाऱ्या भारतीय रेल्वेने लक्ष्मीराणीला छत्तीसगढमधल्या बिलासपूर येथे नोकरी दिली आहे.
बागुलातील सरकारी शाळेत शिकत असताना लक्ष्मीराणी फुटबॉल खेळायची. मात्र शाळेच्या खेळांमध्ये तिरंदाजीचा समावेश कधीच नव्हता. अशाच एके दिवशी युवा प्रतिभाशोध उपक्रमांतर्गत प्रशिक्षक धर्मेद्र तिवारी लक्ष्मीराणीच्या शाळेत दाखल झाले. तिरंदाजी खेळण्यात, शिकण्यात कोणाला रस आहे का? अशी तिवारी यांनी विचारणा केली. लक्ष्मीराणीच्या वर्गातल्या मुलांनी टीव्हीवर रामायण, महाभारत या मालिकांमध्ये धनुष्यबाण पाहिले होते. परंतु धनुष्यबाण खेळायचा वगैरे गोष्टी त्यांच्या आकलनापलीकडच्या होत्या. पन्नास विद्यार्थ्यांच्या वर्गातून एकच हात वर आला- लक्ष्मीराणीचा. शाळेत शिकणाऱ्या लक्ष्मीराणीचा त्यामागचा विचारही भन्नाट होता. ‘माझे वडील खाणीत धोकादायक काम करतात. त्यांनी हे काम थांबवावं असं मला वाटतं. पण त्यासाठी घरात दुसरं कोणी तरी कमवायला लागणं आवश्यक आहे. तिरंदाजी शिकून पैसे मिळवता येतील. स्वत:च्या पायावर उभं राहून कुटुंब चालवता येईल’. अल्लड आणि चिंताविरहित सुखेनैव शालेय आयुष्यात लक्ष्मीराणीने व्यक्त केलेल्या भावनांनी तिवारी यांना विचार करायला भाग पाडले. आनंद, गंमत, मनोरंजन यापेक्षाही कुटुंबाचा विचार करणाऱ्या लक्ष्मीराणीला तिवारी यांनी जमशेदपूरच्या टाटा आर्चरी अकादमीत दाखल करून घेतलं. शाळकरी मुलीत शिष्य हुडकणाऱ्या तिवारी यांच्या मार्गदर्शनाखालीच लक्ष्मीराणी रिओमध्ये लक्ष्याचा वेध घेणार आहे.
टाटा अकादमीत लक्ष्मीराणीला कॅडेटचा दर्जा देण्यात आला. अकादमी तिचं दुसरं घरच झालं. कौटुंबिक गरज म्हणून तिरंदाजीकडे वळलेल्या लक्ष्मीराणीने अकादमीत तिरंदाजीचे बारकावे आत्मसात केले. उपजत गुणवत्तेला कष्टाची जोड देत लक्ष्मीराणीने राज्य, राष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीय टप्पा झटपट पार केला.
लक्ष्मीराणीच्या प्रवासाची दखल घेत युनिसेफच्या भारत विभागाने तिला सदिच्छादूत केलं आहे. ‘मी आज जे काही आहे ते शिक्षणामुळे. परिस्थिती बेताची असूनही घरच्यांनी माझ्या शिक्षणाला प्राधान्य दिलं. शाळेत असल्यामुळेच तिरंदाजी शिकण्याची संधी मिळाली. आता मी आंतरराष्ट्रीय स्तरावर तिरंदाजीत भारताचे प्रतिनिधित्व करते. पण ही संधी शाळेमुळे मिळाली. शाळेत केवळ घरच्यांमुळे जाऊ शकले,’ असं लक्ष्मीराणी सांगते.
मे महिन्यात झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठत लक्ष्मीराणीने रिओवारी पक्की केली. लक्ष्मीराणीची ही पहिलीच ऑलिम्पिकवारी. रिओमध्ये लक्ष्मीराणी रिकव्‍‌र्ह प्रकारात वैैयक्तिक आणि सांघिक अशा दोन्ही गटांमध्ये सहभागी होणार आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतीय तिरंदाजी पथकाकडून पदकाची अपेक्षा होती. मात्र क्रिकेटची पंढरी असणाऱ्या लॉर्ड्स मैदानात स्वैर वाऱ्यांच्या प्रभावासमोर भारतीय तिरंदाज निष्प्रभ ठरले. चार वर्षांनंतर अपयश पुसून काढण्याची संधी भारतीय तिरंदाजांना मिळणार आहे. ‘दीपिका कुमारी आणि बॉम्बयला देवी यांच्या तुलनेत लक्ष्मीराणीकडे अनुभव कमी आहे. परंतु दडपणाच्या क्षणी खेळ उंचावण्याची तिची हातोटी विलक्षण आहे. अचूक लक्ष्यवेध करत सातत्याने दहा गुण पटकावण्यात ती वाकबगार आहे. लक्ष्मीराणीमुळे संघाचे संतुलन होते,’ असे राष्ट्रीय तिरंदाजी प्रशिक्षक धर्मेद्र तिवारी यांनी सांगितले. गेल्या वर्षी जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत लक्ष्मीराणीने रौप्यपदकाची कमाई केली. लक्ष्मीराणीच्या सातत्यपूर्ण प्रदर्शनाची दखल घेत ‘ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट’ संस्थेने तिला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.
बंगळुरू येथे झालेल्या राष्ट्रीय शिबिरात तिरंदाजी कौशल्याबरोबरच मानसिक कणखरता, तंदुरुस्ती व्यवस्थापन, आहार नियोजन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे. भारतीय पथकाच्या तुलनेत तिरंदाजी संघ खूप आधीच रिओत दाखल झाला आहे. तिरंदाजी केंद्र दूर असल्याने तिरंदाजांना ऑलिम्पिक ग्रामऐवजी स्वतंत्र हॉटेलात राहण्याची अनुमती देण्यात आली आहे. क्रीडा विश्वातल्या सर्वोच्च सोहळ्यासाठी लक्ष्मीराणी तय्यार आहे. आर्थिक आणि सामाजिकदृष्टय़ा सधन वातावरणातच खेळाडू घडतात या समजाला छेद देत छोटय़ा गावातूनही ऑलिम्पिक दर्जाचे क्रीडापटू निर्माण होऊ शकतात हे लक्ष्मीराणीच्या निमित्ताने सिद्ध झाले आहे.
२०१६ मध्ये झालेल्या विश्वचषकात रौप्यपदक विजेत्या भारतीय महिला संघाचा लक्ष्मीराणी भाग होती.
यंदा झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या भारतीय महिला संघाचा भाग होती.
२०१५ मध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक आणि सांघिक प्रकारात सुवर्णपदकावर मोहर.
गेल्या वर्षी डेन्मार्क येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत वैयक्तिक आणि सांघिक प्रकारात रौप्यपदकाची कमाई.