Pakistan vs Oman, Asia Cup 2025: आशिया चषक २०२५ स्पर्धेतील चौथा सामना पाकिस्तान आणि ओमान या दोन्ही संघांमध्ये पार पडला. ओमानचा संघ आशिया चषक स्पर्धेत आपला पहिलाच सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. मात्र ओमानला या स्पर्धेत हवी तशी सुरुवात करता आलेली नाही. १६१ धावांचा पाठलाग करताना ओमानचा डाव अवघ्या ६७ धावांवर आटोपला. यासह पाकिस्तानने हा सामना ९३ धावांनी आपल्या नावावर केला.

या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय सुरुवातीला फसला. डावातील दुसऱ्याच चेंडूवर पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज सॅम अयुब बाद होऊन माघारी परतला. सलामीवीर शहजादा फरहानने २९ धावांची खेळी केली. पाकिस्तानकडून फलंदाजी करताना मोहम्मद हारिसने सर्वाधिक ६६ धावांची खेळी केली. तर फखर जमानने २३ धावा केल्या.शेवटी मोहम्मद नवाजने १९ धावांची खेळी करत पाकिस्तानची धावसंख्या २० षटकांअखेर ७ गडी बाद १६० धावांवर पोहोचवली.

आपला पहिलाच सामना खेळत असलेल्या ओमानला हा सामना जिंकण्यासाठी २० षटकअखेर १६१ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ओमानला हवी तशी सुरूवात करता आली नाही. आमीर कलीम अवघ्या १३ धावांवर माघारी परतला. तर संघाचा कर्णधार जतिंदर सिंगला १ धाव करता आली. त्यानंतर हमद मिर्झाची २७ धावांची खेळी वगळली, तर इतर कुठल्याही खेळाडूला मोठी खेळी करता आलेली नाही. पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना सुफीयान मुकीम, फहीम अशरफ आणि सॅम अयुबने प्रत्येकी २-२ गडी बाद केले. ओमानचा पहिला डाव अवघ्या … धावांवर आटोपला. यासह पाकिस्तानने हा सामना ९३ धावांनी आपल्या नावावर केला.

हा पाकिस्तानचा या स्पर्धेतील पहिला विजय ठरला आहे. यासह पाकिस्तानने २ गुणांसह गुणतालिकेत खातं उघडलं आहे. पाकिस्तानचा पुढील सामना १४ सप्टेंबरला भारतीय संघाविरूद्ध होणार आहे.या सामन्यात दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो. तर ओमानचा संघ आपल्या पुढील सामन्यात सोमवारी यूएईचा सामना करताना दिसून येणार आहे. या विजयासह पाकिस्तानचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे.