Afghanistan Cricketers Died In Pakistan Air Strike: अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या युद्धात ४७ तासांपूर्वी शस्त्रविराम झाला होता. पण पाकिस्तानकडून अफगाणिस्तानातील पक्तिका प्रातांत हवाई हल्ले करण्यात आले. त्यामुळे हा शस्त्रविराम अल्पकालीन ठरला. पाकिस्तानने ड्युरंड रेषेवरील अफगाणिस्तानच्या बर्मल आणि अर्गुन जिल्ह्यांमधील निवासी भागांवर हल्ले केल्याचा आरोप केला जात आहे. या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानच्या ३ क्रिकेटपटूंचा मृत्यू झाला आहे. दरम्यान कोण आहेत ते ३ क्रिकेटपटू? जाणून घ्या.

पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात मृत पावलेले ३ क्रिकेटपटू कोण?

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डने ३ युवा खेळाडूंचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. या खेळाडूंची नावं कबीर आगा, सिबगतुल्लाह आणि हारून अशी आहेत. हे तिघेही अफगाणिस्तानचे क्रिकेटपटू आहेत. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डने दिलेल्या माहितीनुसार, हे खेळाडू फ्रेंडली सामना खेळण्यासाठी पक्तिका प्रातांची राजधानी शरना येथे गेले होते. सामना झाल्यानंतर ज्यावेळी ते आपल्या घरी उरगुनला जात होते. त्यावेळी हवाई हल्ल्यात त्यांना आपला जीव गमवावा लागला.

या हल्लात मृत पावलेले तिन्ही खेळाडू अफगाणिस्तानमध्ये देशांतर्गत क्रिकेट खेळत होते. हे तिन्ही खेळाडू अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात होते. अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय संघाने गेल्या काही वर्षात दमदार कामगिरी केली आहे. या संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनेक बलाढ्य संघांना पराभूत केलं आहे.

या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानने पाकिस्तानविरूद्धच्या ट्राय सीरीजमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. या हवाई हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी अफगाणिस्तानने हा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जात आहे. या ट्राय सीरीजमध्ये अफगाणिस्तान, पाकिस्तानसह श्रीलंकेचा संघ देखील आहे. पण आता अफगाणिस्तानने या मालिकेतून माघार घेतली आहे. या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी अफगाणिस्तानचा स्टार खेळाडू राशिद खानने एक पोस्ट शेअर केली आहे. राशिद खानने पोस्ट शेअर करत, “पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यात अनेक नागरिकांचे मृत्यू झाल्याने मी दु:खी आहे. या हल्ल्यात महिला, मुले आणि जागतिक स्तरावर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या इच्छुक तरुण क्रिकेटपटूंचा मृत्यू झाला आहे.” असे लिहिले आहे.