पाकिस्तान क्रिकेट बोर्डात सध्या अनोख्या द्वंद्वाला सुरुवात झालेली दिसते आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या क्रिकेट प्रशासकीय समितीचे प्रमुख मोहसीन खान यांनी प्रशिक्षक मिकी आर्थर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचं समजतंय. जोपर्यंत मोहसीन खान माफी मागत नाही, तोपर्यंत आपण क्रिकेट बोर्डाच्या कोणत्याही बैठकीला हजर राहणार नसल्याचं आर्थर यांनी स्पष्ट केलंय. पाकिस्तानमधील ‘जंग’ या वृत्तपत्राने यासंदर्भातलं वृत्त दिलेलं आहे.

मोहसीन खान यांची नुकतीच या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. या समितीमध्ये मोहसीन खान यांच्यासह वासिम अक्रम, माजी कर्णधार मिसहाब उल हक व महिला संघाच्या माजी कर्णधार उरुज मुमताज यांनाही स्थान देण्यात आलंय. मोहम्मद आमिर या खेळाडूला पाठींबा दिल्याप्रकरणी मोहसीन खान यांनी आर्थर यांना मूर्ख आणि गाठव अशी उपमा दिली. 2019 च्या विश्वचषकापर्यंत मिकी आर्थर यांना क्रिकेट बोर्डाने मुदतवाढही दिली आहे. निवड समिती आणि संघ व्यवस्थापन यांच्यावर देखरेख ठेऊन योग्य सल्ला देण्याची जबाबदारी प्रशासकीय समितीवर सोपवण्यात आली आहे.

दरम्यान मिकी आर्थर आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीचे प्रमुख इंझमाम उल हक यांच्यातही वाद झाल्याचं कळतंय. काही दिवसांपूर्वी दोघांमध्येही काही खेळाडूंच्या निवडीवरुन मोठा वाद झाला होता. मोहम्मद हाफीजने संघात पुनरागमन करावं अशी इंझमाम यांची इच्छा होती, मात्र मिकी आर्थर यांचा मोहम्मद हाफीजच्या नावाला विरोध होता. यावरुन दोघांमध्ये खटके उडाले होते.