T-20 विश्वचषक स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा दारुण पराभव केला. आयसीसी विश्वचषक सामन्यात पाकिस्तानने भारताला हरवल्याचं हे पहिलंच उदाहरण आहे. यामुळे आता सोशल मीडियावरच दोन्ही संघाच्या समर्थकांकडून चांगलाच दंगा सुरू आहे.
पाकिस्तानच्या संघाचे चाहते चांगलेच खूश असून भारतीय संघाला ट्रोल करत आहे. दरम्यान, “मारो मुझे मारो, वक्त बदल दिया, जज्बात बदल दिये” असं म्हणत स्वतःला मारुन घेणारा पाकिस्तानी तरुण आठवतोय का? त्याचाही नवा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
पाकिस्तानी क्रिकेट चाहता मोमिन साकीब हा त्याच्या या डायलॉगमुळे चांगलाच प्रसिद्ध झाला होता. तो अनेक मीम्सचा विषयही ठरला होता. रविवारी झालेल्या या सामन्यानंतर त्याचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. गेल्या वेळच्या त्याच्या व्हिडिओत पाकिस्तानी संघ हरल्यामुळे त्याने संताप व्यक्त केला होता. “एकदमसे हालात बदल दिये, जज्बात बदल दिये” असं म्हणणारा मोमिन म्हणतोय की आता खऱ्या अर्थाने “हालात बदल दिये”.
रविवारच्या सामन्यात पाकिस्तानने भारताला हरवल्यानंतर मोमिनने जल्लोष साजरा केला आहे. त्याच्या नव्या व्हिडिओत तो म्हणतो, “आता कुठे परिस्थिती बदलली आहे. मी पाकिस्तानच्या लोकांचं अभिनंदन करत आहे. पाकिस्तानी संघाने शानदार कामगिरी केली आहे. हरवण्याची पण एक पद्धत असते. पण १० विकेट्सने हरवलं? हे निर्दयी आहे. हा अन्याय आहे”. त्याचं हे बोलणं ऐकताच मागचे लोक म्हणतात की यालाच आज मारा, मारुन टाका.
मोमिनने रविवारी झालेला हा सामना दुबईमध्ये जाऊन पाहिला. त्याचबरोबर त्याने बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची भेटही घेतली. पाकिस्तानने सामना जिंकल्यानंतर मोमिन आपल्या मित्रांसोबत मैदानावर गेला आणि म्हणाला की शेवटी आम्ही सामना जिंकलोच. आता मला या मैदानावरची माती आणि गवतही खायचं आहे. त्याचा हा व्हिडिओही चांगलाच व्हायरल होत आहे.