Pakistan Captain Salman Ali Agha Throws Cheque Of Runner Up Prize Of Asia Cup: आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारताने शेवटच्या षटकात पाकिस्तानला धूळ चारली आणि विक्रमी ९व्यांदा जेतेपद पटकावले. अत्यंत रोमहर्षक सामन्यानंतरच्या झालेल्या पारितोषिक समारंभातील पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये सलमान आघा त्यांच्या संघाला उपविजेतेपदासाठी मिळालेला प्रतीकात्मक चेक फेकून देत असल्याचे पाहायला मिळाले. सलमान आघाच्या या कृतीनंतर प्रेक्षकांकडून त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे.
काय आहे प्रकरण?
भारतीय संघाने पाकिस्तानचे मंत्री आणि आशियाई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. तर नक्वीही ट्रॉफी देण्याचा हट्ट सोडत नव्हते. त्यामुळे पारितोषिक समारंभ तब्बल तासभर उशीरा सुरू झाला.
यावेळी आशिया चषकाचा उपविजेता पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघाला ७५,००० डॉलर्सचा प्रतीकात्मक चेक बक्षीस म्हणून वितरित करण्यात आला. यावेळी सलमानने हा चेक स्वीकारला, फोटो काढण्यासाठी पोझ दिली, नंतर मागे वळून तो खाली ठेवण्याऐवजी हवेत फेकला आणि हसत हसत निघून गेला.
सलमान आघाच्या या कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यांच्या या उर्मट वर्तनावर क्रिकेट चाहते जोरदार टीका करत आहेत.
लाज वाटली पाहिजे
सलमानने हा चेक स्वीकारून स्टेजवरून सर्वांसमोर फेकून दिल्यानंतर मैदानावर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी त्याच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली.
एक युजर म्हणाला, “प्रिय सलमान आघा तू उपविजेत्यांचे बक्षीस असलेला चेक फेकून दिला. तू या बक्षिसाचा अनादर केला. एका संघाचा कर्णधार म्हणून तू इतका अहंकारी का आहेस? हे आशियाई लोकांचे कष्टाने कमावलेले पैसे आहेत, लाज वाटली पाहिजे.”
एक्सवर एका युजरने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले, “पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार सलमानने उपविजेत्यांसाठी असलेला चेक फेकला, बाळा फेकू नको, या रकमेत गरिबांसाठी १ वर्षासाठी रेशन येईल.”