Pakistan vs Sri Lanka Asia Cup 2025 अबू धाबी : ‘अव्वल चार’ फेरीतील आपापले सलामीचे सामने गमाविणाऱ्या श्रीलंका आणि पाकिस्तानचे विजयी पुनरागमनाचे लक्ष्य असून आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत हे संघ आज, मंगळवारी आमनेसामने येणार आहेत. अंतिम फेरी गाठण्याच्या दृष्टीने दोन्ही संघांना विजय महत्त्वाचा ठरेल.

गतविजेत्या श्रीलंकेच्या संघाने साखळी फेरीत चमकदार कामगिरी केली. त्यांनी अपराजित राहत ‘अव्वल चार’ फेरीत प्रवेश केला. मात्र, या फेरीतील पहिल्याच सामन्यात श्रीलंकेला बांगलादेशकडून हार पत्करावी लागली. यामुळे श्रीलंकेची आशिया चषकातील (ट्वेन्टी-२० प्रारूप) सलग आठ विजयांची मालिकाही खंडित झाली.

दुसरीकडे, पाकिस्तानला पुन्हा एकदा पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर केवळ एकाच दिवसाच्या अंतराने त्यांना श्रीलंकेसारख्या तुल्यबळ संघाविरुद्ध खेळावे लागणार आहे. हा सामना गमावल्यास त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्याचा धोका आहे. पाकिस्तानला विशेषत: फलंदाजीची चिंता आहे. सैम अयुबने तीन सामन्यांनंतर धावांचे खाते उघडले, पण मोठी खेळी करण्यात तो पुन्हा अपयशी ठरला. पाकिस्तानची भिस्त साहिबझादा फरहान आणि फखर झमान यांच्यावर असेल. गोलंदाजीत डावखुऱ्या शाहीन शाह आफ्रिदीने कामगिरी उंचावणे आणि सुरुवातीच्या षटकांत बळी मिळवणे पाकिस्तानच्या दृष्टीने गरजेचे आहे.

श्रीलंकेसाठी फलंदाजांची मधली फळी चिंतेचा विषय ठरत आहे. दसून शनाकाने गेल्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध आक्रमक खेळी केली. परंतु त्याने सातत्य राखणे गरजेचे आहे. सलामीवीर पथुम निसांकाने सलग दोन अर्धशतके साकारली असून त्याला कुसाल मेंडिस आणि कमिल मिसाराने चांगली साथ दिली आहे. आता पाकिस्तानविरुद्ध त्यांच्याकडून मोठ्या खेळीची श्रीलंकेला आशा असेल. गोलंदाजीत नुवान तुषारा आणि वानिंदू हसरंगावर श्रीलंकेची मदार असेल.

वेळ : रात्री ८ वा. थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्टस टेन १, ३.