आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदकाची कमाई करुन मायदेशी परतलेल्या पॅरा जलतरणपटू कांचनमाला पांडेला राज्य सरकारने १५ लाखांचे बक्षीस जाहीर केले. याशिवाय तिला सरकारी नोकरीची ऑफर देखील देण्यात आली आहे. क्रिकेटनंतर फुटबॉलचे वारे वाहणाऱ्या मायदेशात कांचनमालाच्या स्वागताचा उत्साह दिसला नव्हता. मात्र, अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्रिडा आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी तिच्या खेळाचे कौतुक करत लक्षवेधी कामगिरीबद्दल गौरव केला. कांचनमालाने मिळवलेले यश प्रेरणादायी असून, तिला मिळालेला सन्मान हा इतर खेळाडूंना प्रोत्साहन देणारा असाच आहे.
Joined CM @Dev_Fadnavis ji in felicitating the Para World Gold Medalist Kanchanmala Pande with a cash award of ₹15 Lakhs. Encouraging her dedication for the sport, GoM has offered her a Class 1 government job, extending support for her future. pic.twitter.com/UsQWgOY5US
— Vinod Tawde (@TawdeVinod) December 10, 2017
नागपूरच्या कांचनमाला पांडेने मॅक्सिकोमध्ये पार पडलेल्या पॅरा जागतिक जलतरण चॅम्पियन्सशिप स्पर्धेत भारताला सुवर्ण पदकाची कमाई करुन दिली. या स्पर्धेत सुवर्ण कामगिरीची नोंद करणारी कांचनमाला पहिली भारतीय जलतरणपटू ठरली. कांचनमालानं एस-११ श्रेणीत २०० मीटर वैयक्तिक मिडले प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. या स्पर्धेत पात्र ठरलेली कांचनमाला एकमेव भारतीय होती. जन्मत: लाभलेल्या अंधत्वामुळे निराश न होता कांचनमालाने जलतरण प्रकारात आपली वेगळी ओळख निर्माण केली. ती मुळची अमरावतीची असून, आतापर्यंत तिने १० हून अधिकवेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले असून, वेगवेगळ्या प्रकारा तिने १० हून अधिक सुवर्ण आणि पाच रौप्य पदके मिळवली आहेत.
सध्याच्या घडीला आपल्याकडे क्रिकेटला मिळणारी लोकप्रियता प्रचंड आहे. एखाद्या खेळाविषयी लोकप्रियता बाळगणे चुकीचे नाही. पण वैयक्तिक कामगिरीच्या जोरावर देशाचे नाव उंचावणाऱ्या खेळाडूंकडे अथवा इतर खेळाडूंकडे दुर्लक्ष होणार नाही, याची जबाबदारी क्रीडा विभागासोबतच खेळामध्ये रुची ठेवणाऱ्यांची देखील आहे.