Carolina Marin Ruled Out From Injury : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील महिला बॅडमिंटन एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बिंगजियाओविरुद्ध दुखापत झाल्यानंतर स्पॅनिश शटलर कॅरोलिना मारिन रडली, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मारिनने पहिला सेट २१-१४ असा जिंकला आणि दुसऱ्या सेटमध्ये १०-८ अशी आघाडी घेतली. मात्र, यादरम्यान मारिनच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यामुळे मारिन तिच्या चिनी प्रतिस्पर्ध्यीला वॉकओव्हर देण्याचा निर्णय घेतला. मात्र, रिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्याला वॉकओव्हर दिल्यानंतर अश्रू अनावर झाले.

पॅरिस ऑलिम्पिकच्या महिला एकेरीत कॅरोलिना मारिनचा सामना चीनच्या हि बिंगजियाओशी होत होता. बिंगजियाओ ही तिच खेळाडू आहे, जिने पीव्ही सिंधूला पराभूत करून उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. उपांत्य फेरीत तिचा सामना कॅरोलिना मारिनशी झाला. मारिनने तिच्याविरुद्ध आघाडी कायम ठेवली होती. कॅरोलिना मारिनने पहिला सेट २१-१४ असा जिंकला होता आणि दुसऱ्या सेटमध्येही १०-८ अशी आघाडी घेतली होती. मात्र, यावेळी तिला दुखापत झाल्याने स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. कॅरोलिना मारिनच्या बाहेर पडल्यामुळे बिंगजियाओने आता अंतिम फेरी गाठली आहे. कॅरोलिना मारिनसाठी हा नक्कीच मोठा धक्का आहे.

कॅरोलिना मारिन यापूर्वीही जखमी होऊन बाहेर पडली होती-

यापूर्वी इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेत कॅरोलिना मारिनसोबतही असेच काहीसे घडले होते. सायना नेहवालविरुद्धच्या सामन्यात मारिन दुखापतीचे बळी ठरली होती. तिथेही ती चांगल्या स्थितीत होती पण दुखापतीमुळे तिला बाहेर पडावे लागले. त्यानंतर सायना नेहवालनेही रुग्णालयात जाऊन तिची भेट घेतली होती. यावेळीही कॅरोलिना मरिनसोबत असेच काहीसे घडले आहे.

हेही वाचा – Indian Hockey Team : भारताने ब्रिटनला पेनल्टी शूटआऊटमध्ये धूळ चारत रचला इतिहास, उपांत्य फेरीत मारली धडक

रिओ ऑलिम्पिक २०१६ मध्ये पीव्ही सिंधूचा कॅरोलिना मारिनसोबत अंतिम सामना झाला होता. त्या चुरशीच्या सामन्यात कॅरोलिना मारिनने पीव्ही सिंधूचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले आणि सिंधूने पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले. मात्र, यंदा पदक जिंकण्याची तिचे स्वप्न भंगले. पीव्ही सिंधू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये पदक जिंकू शकली नाही. यावेळी तिचा प्रवास केवळ उपांत्यपूर्व फेरीपर्यंतच मर्यादित राहिला. गेल्या दोन ऑलिम्पिकमधून तिने पदके जिंकली होती. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पीव्ही सिंधूला पदक न मिळणे हा भारतासाठी मोठा धक्का होता.