AUS vs SA, Pat Cummins Record: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २२०५ स्पर्धेतील अंतिम सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्टेलिया या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना चांगलाच घाम फोडला. पहिल्या दिवशी, दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी गडबडली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी टेंबा बावुमा आणि बेडिंघम या जोडीने दक्षिण आफ्रिकेला कमबॅक करून दिलं. मात्र, पॅट कमिन्सने ६ विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण डाव अवघ्या १३८ धावांवर आटोपला आहे.

हा सामना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्ससाठी ऐतिहासिक ठरला आहे. या डावात गोलंदाजी करताना त्याने दक्षिण आफ्रिकेच्या ६ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली. यादरम्यान त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत ३०० गडी बाद करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. हा रेकॉर्ड त्याने आपल्या ६८ व्या कसोटी सामन्यात करून दाखवला आहे. यादरम्यान त्याने १४ वेळेस ५ एकाच डावात ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे. ऑस्ट्रेलियासाठी ३०० गडी बाद करणारा तो चौथा सर्वात वेगवान गोलंदाज ठरला आहे.

पॅट कमिन्सने २०११ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. पदार्पणात गोलंदाजी करताना त्याने ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला होता. त्यानंतर दुखापतीमुळे ६ वर्ष त्याला कसोटी क्रिकेटपासून दूर राहावं लागलं होतं. हे ६ वर्ष वाया गेले नसते, तर त्याने आणखी विकेट्स घेऊन कसोटी क्रिकेटमधील मोठे रेकॉर्ड मोडून काढले असते.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३–२५ स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज

यासह पॅट कमिन्सच्या नावे आणखी एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमराहला मागे सोडलं आहे. जसप्रीत बुमराहच्या नावे या हंगामात ७७ गडी बाद करण्याची नोंद आहे. आता पॅट कमिन्सने त्याला मागे सोडलं आहे. कमिन्सच्या नावे ७९ गडी बाद करण्याची नोंद आहे.

दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण डाव १३८ धावांवर संपुष्टात

या सामन्यातील पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण डाव अवघ्या २१२ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेला अवघ्या १३८ धावा करता आल्या. दक्षिण आफ्रिकेकडून फलंदाजी करताना बेडिंघमने सर्वाधिक ४५ धावांची खेळी केली. तर कर्णधार टेंबा बावुमाने ३५ धावांची खेळी केली. पण पॅट कमिन्सच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण डाव अवघ्या १३८ धावांवर आटोपला.