प्रो कबड्डी लीगच्या (PKL 8) ८२व्या सामन्यात, जयपूर पिंक पँथर्सने पाटणा पायरेट्सचा ५१-३० असा पराभव करत शानदार विजय नोंदवला. पाटणा पायरेट्सचा १३ सामन्यातील हा चौथा पराभव आहे. जयपूर पिंक पँथर्सच्या अर्जुन देशवालने चमकदार कामगिरी करताना १७ रेड पॉइंट घेतले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पहिल्या हाफनंतर जयपूर पिंक पँथर्स २५-११ ने पुढे होता. जयपूरने चमकदार कामगिरी करत सामन्याच्या आठव्या मिनिटाला पायरेट्सला ऑलआऊट केले. पूर्वार्ध संपण्यापूर्वी पाटणा पायरेट्स पुन्हा एकदा ऑलआऊट झाला आणि जयपूरला भक्कम आघाडी मिळाली.

हेही वाचा – Australian Open Final : राफेल नदाल ठरला बाजीगर..! २१वं ग्रँडस्लॅम जिंकत रचला नवा इतिहास

उत्तरार्धातही जयपूरने आपली आघाडी कायम राखली आणि सामना पाटणाच्या आवाक्याबाहेर नेला. जयपूरचा कर्णधार संदीप धुलने बचावात हाय ५ धावा पूर्ण केले. पाटणासाठी गुमान सिंगने सामन्यात ११ रेड पॉइंट्स घेतले, परंतु त्याला संघाला एकतर्फी पराभवापासून वाचवता आले नाही.

दुसऱ्या सामन्यात बंगळुरू बुल्सला तमिळ थलायवाजकडून २४-४२ अशा फरकाने पराभूत व्हावे लागले. बंगळुरूचा स्टार रेडर पवन सेहरावतला या सामन्यात तमिळच्या संघाने जखडून ठेवले. त्यामुळे त्याच्याकडून संघाला जास्त गुण मिळाले नाहीत. तर तमिळ संघाच्या अजिंक्य पवारने १० गुण घेत आपल्या संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला. अजिंक्यसोबत मनजीतने ८ गुण घेतले.

पहिल्या हाफनंतर तमिळ थलायवाजने सामन्यात २१-८ अशी जबरदस्त आघाडी घेतली. तमिळ थलायवाजने पूर्वार्धात बंगळुरू बुल्सला दोनदा ऑलआऊट करून सर्वांना चकित केले. पवन सेहरावतला पूर्वार्धात केवळ २ गुण घेता आले. तमिळ थलायवाजने उत्तरार्धातही आपली चमकदार कामगिरी सुरू ठेवली आणि बंगळुरू बुल्सला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. ३१व्या मिनिटाला तमिळ थलायवासने तिसऱ्यांदा ऑलआऊट करत आपली आघाडी २२ गुणांपर्यंत वाढवली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pkl jaipur pink panthers vs patna pirates and bengaluru bulls vs tamil thalaivas adn