बंगळुरुचा आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रमोद जोशुआ हा आगामी सीएट चषक निमंत्रित सुपरक्रॉस लीगसाठी सर्वात महागडा स्पर्धक ठरला आहे. डीएसके रेसिंग संघाने एक लाख १० हजार रुपयांची बोली लावून त्याला विकत घेतले आहे.
ही लीग तीन फेऱ्यांमध्ये होत असून पहिली फेरी ८ व ९ नोव्हेंबर रोजी नाशिक येथे होणार आहे तर दुसरी फेरी १५ व १६ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर येथे होईल. अंतिम फेरी १२ ते १४ डिसेंबर दरम्यान पुण्यात होणार आहे. ही लीग सात फ्रँचाईजींमध्ये होणार आहे. सर्वाधिक बोली मिळालेल्या जोशुआने २०११ मध्ये राष्ट्रीय सुपरक्रॉस स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते.
सुपरक्रॉस लीगसाठी इशान दासनायके याला त्याच्या खालोखाल एक लाख ६ हजार रुपयांची बोली मिळाली. सॅन रेसिंग संघाने त्याला विकत घेतले आहे. एस.बालन समूहाने गौरव खत्री याला एक लाख २ हजार रुपयांची बोली लावून विकत घेतले तर हरीथ नोहा याला एक लाख रुपयांची बोली मिळाली. त्याला अरान्हा रेसिंग संघाने खरेदी केले. पुण्याच्या सात स्पर्धकांना बोलीमध्ये संधी मिळाली. त्यापैकी विशाल बारगुजे याला सर्वाधिक ६८ हजार रुपयांची बोली मिळाली. त्याला सॅन रेसिंग संघाने विकत घेतले.
या स्पर्धेसाठी रिकी यॉर्क्स, डेनिस स्टेपलटॉन, जेरॉड हिक्स (अमेरिका), रिनार्ड अ‍ॅन्थोनी (दक्षिण आफ्रिका), आंद्रियन लोपेझ (फ्रान्स), जॅक शिप्टन (इंग्लंड), अ‍ॅलेक्झांडर इव्हानीटीन (रशिया) यांनीही आपला प्रवेश निश्चित केला आहे.
कनिष्ठ खेळाडूंच्या विकास कार्यक्रमांतर्गत अवान कोहोक, करण कार्ले, सार्थक चव्हाण, अश्विंदरसिंग, शियाना कौर, युवराज कोंडे, फऱ्हान खान, ऋग्वेद बारगुजे व कयान पटेल यांना विविध संघांनी दत्तक घेतले आहे.