तब्बल तीन हजार चाहत्यांच्या पाठिब्यांचा पुरेपूर लाभ उचलत गतविजेत्या बेंगळूरु रॅप्टर्सने प्रीमियर बॅडमिंटन लीगच्या पाचव्या पर्वातील अंतिम सामन्यात नॉर्थ ईस्टर्न वॉरियर्सवर ४-२ असा विजय मिळवून सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले.
हैदराबाद येथील गचीबोवली बंदिस्त क्रीडा संकुलात झालेल्या या सामन्यात बेंगळूरुने दमदार सुरुवात केली. बेंगळूरुच्या बी. साईप्रणीतने पहिल्या पुरुष एकेरीत ली चेक यिऊला पिछाडीवरून १४-१५, १५-९, १५-३ असे पराभूत केले. मात्र पुरुष दुहेरीत बोदिन इसारा आणि ली याँग यांनी अरुण जॉर्ज-रियान सपुत्रो या जोडीवर १५-११, १३-१५, १५-१४ असा निसटता विजय मिळवून वॉरियर्सला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. ही ‘ट्रम्प’ लढत असल्याने वॉरियर्सने २ गुण मिळवले. महिला एकेरीच्या लढतीत मातब्बर ताई झू यिंगने मिशेल ली हिला १५-९, १५-१२ अशी सहज धूळ चारून बेंगळूरुला २-२ अशी बरोबरी साधून दिली.
त्यानंतर बेंगळूरुच्या ‘ट्रम्प’ लढतीत चॅन सून आणि ईऑन वॉन यांनी कृष्णाप्रसाद आणि किम हा ना यांचा कडवा प्रतिकार १५-१४, १४-१५, १५-१२ असा मोडून काढला आणि बेंगळूरुच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब झाले.
