पृथ्वी शॉ ची क्रिकेट कारकिर्द सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. प्रतिभावान क्रिकेटपटू असलेला पृथ्वी शॉ ला सध्या स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्यासाठी संधी मिळत नाहीये. दरम्यान त्याला मुंबईच्या संघांमधून वगळण्यात आलं आहे. तर आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावातही तो अनसोल्ड राहिला. त्याच्या कारकिर्दीत सर्व चढ-उतार असूनही, तो पुनरागमन करू शकतो असा विश्वास भारताचा मास्टर ब्लास्टर खेळाडू सचिन तेंडुलकरने त्याच्याबाबत दाखवला आहे.
पृथ्वी शॉ गेल्या काही काळात क्रिकेटपासून त्याचं लक्ष विचलित झालं, ज्याचा त्याच्या कारकिर्दीवर परिणाम झाला. सध्याच्या घडीला त्याला भारतीय संघ तर लांबच डॉमेस्टक क्रिकेट खेळायला पण मिळणं अवघड झालं. दरम्यान सचिन तेंडुलकरने त्याला पुन्हा पुनरागमन करण्यासाठी प्रोत्साहित केलं. शॉ म्हणाला, त्याच्या वडिलांनंतर, सचिन तेंडुलकर हा त्याचा सर्वात मजबूत आधार आहे, तो म्हणाला की सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनशी अजूनही त्याचं तितकंच घट्ट नातं आहे.
पृथ्वी शॉ ला कमी वयात त्याच्या क्रिकेट कौशल्यामुळे प्रसिध्दी मिळाली, ज्यामुळे तो वाहत गेला आणि त्याने क्रिकेटकडे दुर्लक्ष केलं. त्याचा सराव कमी झाला आणि इतर गोष्टींना तो अधिक महत्त्व देऊ लागला. त्यानंतर त्याने मी चुकीच्या मित्रांची निवड केल्याचं म्हटलं आहे. या सगळ्यामध्ये सचिन तेंडुलकरच्या त्याच्यावरील विश्वासाने त्याला बळ मिळालं.
पृथ्वी शॉ म्हणाला, सचिन सरांना माझा क्रिकेटमधील प्रवास माहित आहे. मी आणि अर्जुन ८-९ वर्षांचे असल्यापासून एकत्र खेळत मोठे झालो आहोत. सचिन सर पण काही वेळेस आमच्याबरोबर सरावासाठी तिथे असायचे. सचिन सरांशी मी बोललो होतो. दोन महिन्यांपूर्वी ते MIG च्या मैदानावर सराव करत होते आणि मी सुद्धा तिथेच होतो. तेव्हा मी त्यांच्याशी चर्चा केली होती.
शॉ सचिनविषयी पुढे म्हणाला, त्यांचा अजूनही माझ्यावर विश्वास आहे. सचिन सर म्हणाले, पृथ्वी, माझा तुझ्यावर विश्वास आणि तुझ्यावरचा हा विश्वास कायम असेल.’ कारण त्यांनी मला सुरूवातीपासून पाहिलं आहे. मला आजही ते हेच म्हणतात ‘पुन्हा योग्य मार्गावर ये, जसा आधी होतास.’ सर्वकाही अजूनही शक्य आहे.’ त्यांचा माझ्यावर विश्वास आहे आणि ही गोष्टच माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे.
पृथ्वी शॉ ने आता मुंबई क्रिकेट संघाची साथ सोडली आहे. तो मुंबई सोडून आता महाराष्ट्र क्रिकेट संघाकडून खेळणार आहे. दरम्यान एमसीएने देखील त्याला ना हरकत प्रमाणपत्र दिलं आहे.