सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक
भारताच्या पी. व्ही. सिंधूने मकाऊ खुल्या टेनिस स्पध्रेत जेतेपदाची हॅट्ट्रिक साजरी करण्याच्या दिशेने वाटचाल केली. शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीत सिंधूने जपानच्या अकाने यामागुचीचा तीन गेममध्ये पराभव केला. जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानावर असलेल्या सिंधूने एक तास तीन मिनिटे चाललेला हा सामना २१-८, १५-२१, २१-१६ असा जिंकला. २०१३ आणि २०१४मध्ये सिंधूने मकाऊ खुल्या स्पध्रेचे जेतेपद पटकावले होते.
विश्व अजिंक्यपद स्पध्रेतील दोन कांस्यपदक नावावर असलेल्या सिंधूला या स्पध्रेत पाचवे मानांकन देण्यात आले आहे. अंतिम सामन्यात सिंधूसमोर मिनात्सू मितानीचे आव्हान आहे. ताकदवान अचूक स्मॅशचा नजराणा पेश करत सिंधूने पहिला गेम अवघ्या १४ मिनिटांत नावावर केला, परंतु यामागुचीने हार न पत्करता दुसऱ्या गेममध्ये दमदार पुनरागमन केले. दोन्ही खेळाडूंनी तोडीस तोड खेळ करताना हा गेम १५-१५ असा बरोबरीत ठेवला होता. मात्ऱ, जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या यामागुचीने कुरघोडी केली आणि सामना १-१ असा बरोबरीत आणला.
तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये सिंधूने आपला खेळ अधिक बहारदार करताना ११-५ अशी आघाडी घेतली. यामागुचीने ही पिछाडी भरून काढत सामन्यात चुरस निर्माण केली खरी, परंतु सिंधूने पाच गुणांच्या फरकाने बाजी मारून अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. या विजयाबरोबर सिंधूने २०१३च्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पध्रेत यामागुचीकडून झालेल्या पराभवाचा वचपा काढला.
संग्रहित लेख, दिनांक 29th Nov 2015 रोजी प्रकाशित
पी. व्ही. सिंधू अंतिम फेरीत
भारताच्या पी. व्ही. सिंधूने मकाऊ खुल्या टेनिस स्पध्रेत जेतेपदाची हॅट्ट्रिक साजरी करण्याच्या दिशेने वाटचाल केली.
Written by मंदार गुरव

First published on: 29-11-2015 at 01:53 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pv sindhu in final round