दुखापतींच्या ससेमिऱ्यातून बाहेर पडत दमदार पुनरागमनाच्या प्रयत्नात असलेल्या राफेल नदालला कतार टेनिस स्पर्धेत पहिल्याच लढतीत अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. दुखापती आणि फॉर्म या दोन्ही आघाडय़ांवर अद्यापही सक्षम नसल्याचे या पराभवाने स्पष्ट झाले आहे. वर्षांतील पहिली ग्रँडस्लॅम अर्थात ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा काही दिवसांतच सुरू होत आहे. ३४ वर्षीय मायकेल बेररने नदालवर ६-१, ३-६, ६-४ असा विजय मिळवला. यंदाच्या हंगामातील नदालचा हा पहिलाच सामना होता. जागतिक क्रमवारीत अव्वल शंभर खेळाडूंमध्येही नसलेल्या आणि पात्रता फेरीतून मुख्य फेरीत दाखल झालेल्या बेररचा हा शेवटचा हंगाम आहे. पाठ आणि मनगटाच्या दुखापतीने त्रस्त असलेल्या नदालने एक सेट जिंकत पुनरागमनाचा प्रयत्न केला, मात्र तो अपुराच ठरला.