Rajat Patidar Catch: दुलीप ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना साऊथ झोन आणि सेंट्रल झोन या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. हा सामना बंगळुरूतील बीसीसीआय सेंट्रल ऑफ एक्सीलेंसच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना साऊथ झोन संघाचा डाव स्वस्तात आटोपला. दरम्यान सेंट्रल झोन संघाचा कर्णधार रजत पाटीदारने क्षेत्ररक्षण करताना भन्नाट झेल घेतला आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ही घटना सेंट्रल झोन संघाची गोलंदाजी सुरू असताना घडली. साऊथ झोन संघाची फलंदाजी सुरू असताना, सेंट्रल झोन संघाकडून ४९ वे षटक टाकण्यासाठी फिरकीपटू सारांश जैन गोलंदाजीला आला. त्यावेळी सलमान निजार फलंदाजी करत होता. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर सारांशने सलमान निजारला आपल्या जाळ्यात अडकवलं.
उजव्या हाताचा गोलंदाज सारांश ओव्हर द विकेटचा मारा करत होता. त्याने चेंडूचा टप्पा ऑफ आणि मिडल स्टंप लाईनवर ठेवला. चेंडूला टप्पा पडताच चांगली उसळी मिळाली, त्यामुळे चेंडू बॅटची कडा घेऊन हवेत गेला.चेंडू हवेत असताना सिली पाँईंटला असलेल्या खेळाडूने झेल घेण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू त्याच्या हातात पूर्णपणे आला नाही. त्याच्या हातून झेल निसटल्यानंतर रजत पाटीदारने डाईव्ह मारून एका हाताने भन्नाट झेल घेतला.
दुलीप ट्रॉफीतील अंतिम सामन्यात सेंट्रल झोन संघाचा कर्णधार रजत पाटीदारने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेला साऊथ झोन संघाचा डाव पहिल्या डावात ६३ षटकात १४९ धावांवर आटोपला. सेंट्रल झोन संघाकडून गोलंदाजी करताना सारांश जैनने २४ षटकात ४९ धावा खर्च करून ५ गडी बाद केले.
तर कुमार कार्तिकेयने गोलंदाजी करताना २१ षटकात ५३ धावा खर्च करून ४ गडी बाद केले. सेंट्रल झोन संघातील गोलंदाज चमकले. आता फलंदाजांवर पहिल्या डावात मोठी आघाडी मिळवून देण्याची जबाबदारी असणार आहे. दरम्यान फलंदाज कशी कामगिरी करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.