गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी करीत महाराष्ट्राला रणजी क्रिकेट सामन्यात कर्नाटकविरुद्ध पहिल्या डावात ३२ धावांची आघाडी मिळवून दिली. मात्र दिवसअखेर महाराष्ट्राचा दुसरा डाव २ बाद १३ असा अडचणीत सापडला.
दुसऱ्या दिवशी कर्नाटकने १ बाद ५० धावांवर पहिला डाव पुढे सुरू केला, मात्र अनुपम संकलेचा, श्रीकांत मुंडे व निकित धुमाळ यांच्या अचूक माऱ्यापुढे कर्नाटकचा डाव ६७.४ षटकांत १८० धावांमध्ये कोसळला. मयांक अगरवाल याने सर्वाधिक ३३ धावा केल्या. महाराष्ट्राला पहिल्या डावात महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली खरी; मात्र सामन्याचे अद्याप दोन दिवस बाकी असल्यामुळे सामना निर्णायक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अगरवाल याने सर्वाधिक ३३ धावा करताना पाच चौकार मारले. उथप्पा याने महाराष्ट्राकडून संकलेचा याने ५८ धावांमध्ये चार बळी घेतले. मुंडे व धुमाळ यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले.
आर.विनयकुमारने स्वप्नील गुगळे (८) व चिराग खुराणा (०) यांना बाद करीत महाराष्ट्राच्या डावास खिंडार पाडले. या दोन बळींमुळे कर्नाटकने आपले आव्हान कायम राखले आहे. खेळ संपला त्या वेळी महाराष्ट्राचे संग्राम अतितकर (नाबाद ०) व राहुल त्रिपाठी (नाबाद ५) ही जोडी खेळत होती.