बंगळूरु : कर्णधार अर्पित वसावडाने (४०६ चेंडूंत २०२ धावा) झळकावलेल्या दिमाखदार द्विशतकाने सौराष्ट्राला रणजी करंडक स्पर्धेत अंतिम फेरीच्या उंबरठय़ावर नेऊन ठेवले आहे. सौराष्ट्राने शनिवारी चौथ्या दिवसअखेरीस मध्य प्रदेश संघावर पहिल्या डावात १२० धावांची निर्णायक आघाडी घेतली.
तिसऱ्या दिवसअखेरीस ११२ धावांवर नाबाद असणाऱ्या वसावडाने चौथ्या द्विशतकी मजल मारली. चिराग जानीने ७२ धावांची खेळी करताना सौराष्ट्राच्या डावाला बळकटी आणण्यात आपला वाटा उचलला. कर्नाटकाच्या ४०७ धावांना प्रत्युत्तर देताना सौराष्ट्राने ५२७ धावा केल्या. कर्नाटकाच्या वेगवान गोलंदाज विद्वत कावेरप्पाने ८३ धावांत ५ गडी बाद केले.
चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा कर्नाटकाने दुसऱ्या डावात ४ बाद १२३ धावा केल्या होत्या. निकिन जोस ५४ धावांवर नाबाद होता. पहिल्या डावात द्विशतकी खेळी करणारा मयांक अगरवाल ५५ धावा काढून बाद झाला. त्यानंतर रविकुमार समर्थ, देवदत्त पड़िक्कल, मनीष पांडे हे फलंदाज बाद झाले. सौराष्ट्राकडून दुसऱ्या डावा चेतन सकारियाने २४ धावांत २ गडी बाद केले.
बंगालची ५४७ धावांची मोठी आघाडी
इंदूर : बंगालनेही रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत गतविजेत्या मध्य प्रदेश विरुद्ध त्यांनी चौथ्या दिवसअखेरीस ५४७ धावांची भक्कम आघाडी मिळविली आहे. पहिल्या डावात २६८ धावांची आघाडी मिळविणाऱ्या बंगालने चौथ्या दिवस अखेरीस आपली आघाडी भक्कम करताना ९ बाद २७९ धावा केल्या होत्या. मध्य प्रदेशच्या सारांश जैनने १०३ धावांत ६ गडी बाद केले आहेत.
